वारकऱ्यांच्या सोयी सुविधांसाठी ग्रामविकास विभागाकडून सहा कोटी रुपयांचा निधी - ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, तरडगाव, लोणंद पालखी तळ, नीरा दत्तघाट व पालखी मार्गाची पाहणी

by Team Satara Today | published on : 13 July 2026


सातारा  :  श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी  ग्रामविकास विभागाकडून खंडाळा व फलटण तालुक्यात वारकऱ्यांना विविध मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यासाठी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत ५ कोटी ९२ लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून पाडेगाव, तरडगाव, बरड तसेच लोणंद परिसरात वारकऱ्यांसाठी विविध सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

पालखीसाठी गतवर्षी पेक्षा जास्त निधी यावर्षी ग्रामविकास खात्याने दिला आहे. संताचे पालखी सोहळे, राज्यातील तिर्थक्षेत्र तसेच वारकऱ्यांना सुविधांसाठी निधी द्यायला ग्रामविकास विभाग कधीच कमी पडणार नाही,  अशी ग्वाही राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी तरडगाव व लोणंद पालखी तळ, नीरा दत्तघाट व पालखी मार्गाची पाहणी केली यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार धैर्यशील कदम, सुवर्णगाथा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. नितीन सावंत, समाज कल्याण सभापती ऋषीकेश धायगुडे, खंडाळा पंचायत समिती सभापती छायाताई जाधव, प्रांताधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार सुहास थोरात, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड, पंचायत समिती सदस्य अतुल पवार, तृप्ती घाडगे, ज्योती डोनीकर, राहुल घाडगे, तेजस क्षीरसागर आदी उपस्थित होते.

यावेळी जयकुमार गोरे म्हणाले,  पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना मुलभूत सुविधा देण्यासाठी ग्रामविकास खात्याने कोटेकोर नियोजन केले आहे. पालखी काळात वारकऱ्यांची व भाविकांची कसलीही गैरसोय होणार नाही यासाठी सर्वच विभागांनी योग्य ती काळजी घ्यावी. सातारा जिल्ह्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येणार असून वारकऱ्यांना सुविधा देताना कोणीही हलगर्जीपणा करू नका. पालखी मार्गावर तसेच मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांना पिण्याचे पाणी, औषधे, स्नानगृह, वारकरी निवारा केंद्र, स्वागत कमान, शौचालय आदी सर्व मुलभूत सुविधा देण्याचा शासनाने प्रयत्न केला आहे. त्यामुळे वारकऱ्यांची पंढरीची वारी यावर्षी अधिक सुखकर होणार आहेे.

पालखी सोहळ्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत मंजूर कामांमध्ये पाडेगाव येथे नीरा नदीकाठी घाट बांधणे, पाडेगाव नीरा घाट येथे दशक्रिया चौथरा व अस्थिकुंड बांधणे, पाडेगाव नीरा घाट येथे बंदिस्त गटर व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, नीरा दत्तघाट नदीकाठी काँक्रिटीकरण,

नीरा घाट लाईट व्यवस्था, नीरा घाट जलशुद्धीकरण प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत संरक्षण भिंत व रस्ता सुधारणा, लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत दुरुस्ती, लोणंद  प्राथमिक आरोग्य केंद्र  अंतर्गत व बाह्य विद्युतीकरण, पाडेगाव येथे वारकरी निवासस्थान व इतर सुविधा, नीरा घाट येथे वारकऱ्यांसाठी विद्युत व्यवस्था, तरडगाव पालखीतळ सुधारणा, रस्ता व बंदिस्त गटर, तरडगाव येथे स्नानगृहासाठी कंपाऊंड वॉल, तरडगाव पालखीतळ येथे विद्युतीकरण, बरड पालखीतळ परिसरातील रस्ता काँक्रिटीकरण,  बरड पालखीतळ विस्तारीकरण व बंदिस्त गटर, बरड पालखीतळ येथे विद्युतीकरण, लोणंद परिसरातील पालखी काळात वापरण्यात येणाऱ्या पर्यायी रस्ते आधी कामांचा समावेश आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सानुग्रह अनुदान योजनेच्या धनादेश व गटई स्टॉलचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात वितरण
पुढील बातमी
‘तख्ताचा वाडा’ उभारा; शाहू महाराजांचे भव्य स्मारक साकार करा; येसूबाई फाउंडेशनची आक्रमक भूमिका; संस्थापक सुहास राजेशिर्के यांची नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्याशी चर्चा

संबंधित बातम्या