सातारा : शहरातील मोळाचा ओढा परिसरात गॅरेज मालक अक्षय रामदास गाडे याच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करणाऱ्या सहा आरोपींना शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पोलिसांच्या डीबी पथकाने बुधवारी मोळाचा ओढा आणि करंजे नाका परिसरातून सर्व संशयित आरोपींची पायी धिंड काढली. उंबरकर गॅंगची ही अनवाणी वरात काढत पोलिसांनी वाढत्या कोयता गॅंगच्या दहशतीवर वचक बसवण्याचा प्रयत्न केला.
ज्या ठिकाणी हल्ल्याचा कट रचण्यात आला आणि ज्या ठिकाणी प्रत्यक्ष हल्ला झाला, त्या ठिकाणी आरोपींना पायी चालवत त्यांची भर उन्हात वरात काढण्यात आली. घटनाक्रमाची माहिती घेण्यासाठी तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची पडताळणी करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. सध्या सर्व सहा आरोपी पोलीस कोठडीत असून, आणखी तीन आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
काही दिवसांपूर्वी फिर्यादीच्या नातलगांकडून जमिनीच्या वादातून सुपारी घेऊन संबंधित आरोपींनी गॅरेज मालकावर कोयत्याने हल्ला केला होता. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून सहा जणांना अटक केली.धिंडीदरम्यान मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नागरिकांनीही ही कारवाई पाहण्यासाठी गर्दी केली होती. शहरात वाढत चाललेल्या कोयता गॅंगच्या कारवायांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली जातील, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.