मॅरेथॉनच्या एक्स्पोचे शेंद्रे येथे उद्यापासून आयोजन

जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन रविवारी; देशभरातून ८००० धावपटूंची नोंदणी

by Team Satara Today | published on : 10 September 2025


सातारा. दि. १० : सातारा रनर्स फाउंडेशनतर्फे दरवर्षी आयोजित केली जाणारी आणि देशभरात लोकप्रिय असलेली ‘जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन’ रविवारी दि. १४ सप्टेंबर रोजी होणार असून या मॅरेथॉनसाठी देशभरातून तब्बल ८००० धावपटूंनी नोंदणी केली आहे. या मॅरेथॉनचा भव्य एक्स्पो शुक्रवारा दि. १२ व शनिवारी दि. १३ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.

शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कै. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक संकुलत हा एक्स्पो शुक्रवारी दि. १२ रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ७ आणि शनिवारी दि. १३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत खुला राहणार आहे. एक्स्पोचे उद्घाटन शनिवारी दि. १३ रोजी सकाळी ११ वाजता सौ. वेदांतिकाराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. अजिंक्यतारा सहकारी कारखान्याचे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यावेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मॅरेथॉन संयोजन समितीचे अध्यक्ष उपेंद्र पंडित, उपाध्यक्ष विशाल ढाणे व सेक्रेटरी शैलेश ढवळीकर यांनी दिली. या एक्स्पोमध्ये धावपटूंना मॅरेथॉनसाठी आवश्यक असणारे रेस कीट वितरित केले जाणार असून त्यामध्ये टी शर्ट, रनिंग बीब, संगणकीकृत टायमिंग चिप आदींचा समावेश आहे.

एक्स्पोच्या दिवशी स्पर्धकांना त्यांचे रेस कीट मिळण्यासाठी मॅरेथॉनची नोंदणी केल्यानंतर सपर्धकांच्या मोबाइलवर आलेला क्यूआर कोड स्कॅन केला तर तुम्हाला तुमचे बिब मिळू शकते. त्याबरोबरच नोंदणीचा पुरावा म्हणून आलेला ई- मेल अथवा मोबाइलवरील संदेश दाखवणे आवश्यक आहे. तसेच वय व रहिवासी पत्त्याचा पुरावा म्हणून आधारकार्ड सोबत आणणे अनिवार्य आहे, असे आवाहन मॅरेथॉनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप काटे यांनी केले आहे.

सर्व सातारकरांसाठी हा एक्स्पो खुला 

स्थानिक सातारकर धावपटूंनी आपले रेस कीट शक्यतो पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी दि. १२ रोजी ताब्यात घ्यावे, दुसऱ्या दिवशी बाहेरगावच्या स्पर्धकांना रेस कीट सहजपणे घेता येईल व गर्दी टाळली जाईल, असे आवाहन रेस डायरेक्टर डॉ. अविनाश शिंदे यांनी केले आहे. या एक्स्पोमध्ये देशभरातील अनेक नामांकित आस्थापना त्यांच्या विविध उत्पादनांचे स्टॉल्स उभारणार असून यामध्ये उत्कृष्ट दर्जाचे शूज, स्पोर्ट्सवेअर तसेच फिटनेसशी संबंधित इतर सर्व साहित्य उपलब्ध असेल. याठिकाणी असणाऱ्या फूड कोर्टमध्ये संतुलित, आरोग्यासाठी पोषक व चविष्ट खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी मिळेल. काही सातारकर नागरिकांनी या मॅरेथॉनसाठी नोंदणी केली नसली तरीदेखील सर्व सातारकरांसाठी हा एक्स्पो खुला असून एक्स्पोला सर्व सातारकरांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन संयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
रांचीमधून ISIS संशयिताला अटक
पुढील बातमी
मोबाइलचा हॉटस्पॉट सुरू न केल्याने वडिलांवर वार

संबंधित बातम्या