सातारा तालुक्यातील सोनवडीचे सुपुत्र जवान संग्राम खामकर यांना वीरमरण; परिसरावर शोककळा

by Team Satara Today | published on : 28 November 2026


परळी : देशाच्या रक्षणासाठी आयुष्य समर्पित करण्याचे स्वप्न उराशी बाळगून भारतीय सुरक्षा दलात भरती झालेल्या सोनवडी, ता. सातारा येथील जवान संग्राम रामदास खामकर (वय ४२) यांना पश्चिम बंगालमधील मालदा येथे हृदयविकाराने वीरमरण आले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सोनवडी गावासह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली.
जवान संग्राम खामकर यांची २००५ मध्ये गुजरातमधील गांधीनगर येथे झालेल्या भारतीय सुरक्षा दलाच्या भरती प्रक्रियेत पहिल्याच प्रयत्नात निवड झाली. सध्या त्यांची नियुक्ती पश्चिम बंगाल येथे होती. काही दिवसांपूर्वी त्यांची दुसऱ्या युनिटमध्ये बदली झाली होती. दिवाळीनिमित्त ते दहा दिवसांच्या सुट्टीवर गावी आले होते. भाऊबीजेच्या दिवशी ते आपल्या कुटुंबीयांसोबत होते.
सुट्टी संपल्यानंतर सोमवार, दि. २३ रोजी ते पुन्हा कर्तव्यावर रुजू होण्यासाठी पश्चिम बंगालकडे रवाना झाले. जुन्या युनिटमधून नवे युनिट असलेल्या मालदा येथे जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. संग्राम यांच्या पश्चात तेजश्री ही सहावीत शिकणारी मुलगी, शिवरत्न हा चौथीत शिकणारा मुलगा, पत्नी, आई-वडील व दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांचे एक बंधू भारतीय सैन्यदलात सेवा बजावत असून, वडील व आई शेती करतात.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांना दिलासा; जात प्रमाणपत्र वैध, सर्व कागदपत्रांची तपासणी करून निर्णय प्रक्रिया पूर्ण
पुढील बातमी
सध्या भाजपविरोधात जनक्षोभ, भाजप २०२९ ची निवडणूक जिंकणार नाही; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

संबंधित बातम्या