पर्यावरण पूरक होळी साजरी करण्याकडे सातारकरांचा कल

नैसर्गिक रंगांनी सातारची बाजारपेठ सजली

by Team Satara Today | published on : 12 March 2025


सातारा : हुताशनी पौर्णिमा अर्थात होळी हा सण पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा करण्याकडे सातारकरांचा कल वाढत आहे. होळी म्हणजे वाईट गुणांचे दहन आणि चांगल्या पद्धती-परंपरांचा संकल्प, अशा होळी सणासाठी सातारा नगरी सज्ज झाली आहे. मात्र होळीमध्ये लाकडांचे दहन करण्याऐवजी गोवर्‍या शेण्या यांचा वापर करून होळी सण साजरा करण्याकडे कल दिसून येत आहे. दरवर्षीप्रमाणे होळी लहान करा, पोळी दान करा, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

होळीचा रंगांचा सण नात्यांचा, दुष्ट आणि वाईट प्रवृत्तींचे निर्दालन करणारा सण म्हणून साजरा केला जातो. हा सण रंगांचा आणि सर्वांचा आनंद द्विगुणीत करणारा असतो. त्यामुळे तो पर्यावरण पूरक साजरा करावा, असे आवाहन सातार्‍यातील सामाजिक संघटनांनी केले आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातारा यांच्या वतीने पर्यावरण पूरक होळीसाठी वृक्षारोपण, पोळी दान, तसेच वृक्ष संवर्धन या विविध उपक्रमांचे आवाहन करण्यात आले आहे. सातारा शहर आणि परिसरामध्ये गेल्या वीस वर्षापासून अंधश्रद्धा निर्मूलन समिती पर्यावरणाचा समतोल, पाण्याचा अपव्यय टाळणे आणि वाईट प्रवृत्तींचे दहन, हा संदेश घेऊन जनजागरणाचे काम करत आहेत. दौलत नगर, करंजे, विलासपूर, गोडोली येथे होळीमध्ये नैवेद्य म्हणून वाहण्यात येणारे अन्न, पोळी, नारळ इत्यादीचे संकलन करून ते गोरगरीब वस्तीमध्ये वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सातार्‍याची बाजारपेठ ही नैसर्गिक रंगांनी सजली आहे. रासायनिक रंग त्वचेला हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे कोरडे आणि सहज पाण्याने निघून जातील, असे रंग बाजारात उपलब्ध असून त्यांच्या खरेदीसाठी सातारकरांची गर्दी होत आहे. फुले, हळद किंवा इतर वनस्पतींच्या स्त्रोतापासून बनवलेले सेंद्रिय व नैसर्गिक रंग निवडावेत, असे आवाहन करण्यात येत आहे. सणासुदीच्या या काळात जास्त पाणी वाया न घालवता मर्यादित पाण्याचा वापर करून होळी साजरी केली जावी, असे आवाहन सातारा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे. सातारा शहराला दररोज दोन एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. बहुतांश ठिकाणी निळ्या रंगाच्या नळ कनेक्शन चे नळ उघडून त्यातून पाणी घेतले जाते आणि गळतीने लाखो लिटर पाणी वाया जाते. त्यामुळे सातारकरांनी होळीचा आनंद साजरा करताना मर्यादित पाण्याचा वापर करावा, असे आवाहन पालिका प्रशासन करत आहे. याशिवाय गोडोली येथील महेश नलावडे आणि कुटुंबीयांनी होळीच्या निमित्ताने वृक्षतोड ऐवजी वृक्ष संवर्धन हा उपक्रम साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. येथील अजिंक्यतारा किल्ला परिसरात त्यांच्या वतीने दहा वृक्षांचे वृक्षारोपण केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले समाधी स्थळी अभिवादन
पुढील बातमी
कारच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू

संबंधित बातम्या