सातारा : महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळातर्फे राज्यातील सर्व बसस्थानकांवर ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत सातारा विभागातील सर्व बसस्थानकांचे समितीमार्फत स्वच्छता ऑडिट केले जाणार आहे. समिती 5 ते 15 मे या कालावधीत बसस्थानकांची पाहणी करून वरिष्ठ कार्यालयाला मूल्यांकन अहवाल सादर करणार आहे.
या अभियानामुळे बसस्थानकांची स्वच्छता राखली जाणार आहे. अभियानाचे पहिले सर्वेक्षण 5 ते 15 मे या दरम्यान होणार आहे. या अंतर्गत सातारा विभागातील ‘अ’ वर्ग बसस्थानकाचे मूल्यांकन प्रादेशिक मूल्यांकन समिती करणार आहे, तर ‘ब’ आणि ‘क’ वर्ग बसस्थानकांचे मूल्यांकन कोल्हापूर विभागातील समिती 7 ते 13 मे दरम्यान करणार आहे. बसस्थानकांमध्ये स्वच्छता, स्वच्छतागृहांची देखभाल, कर्मचार्यांचे गणवेश आणि हरित बसस्थानक यांसारख्या विविध मापदंडांवर सर्वेक्षण केले जाईल. समिती या सर्वेक्षणांच्या आधारावर गुणांकन करेल. यामुळे बसस्थानकांमध्ये स्वच्छता मोहीम अधिक प्रभावीपणे राबविली जाईल.
बसस्थानकांचे मूल्यांकन नियमितपणे झाल्यास तेथील स्वच्छता कायम राखण्यास मदत होते. प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळतात आणि कर्मचार्यांमध्येही अधिक चांगली सेवा देण्याची प्रेरणा निर्माण होते.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत सातारा जिल्ह्यातील सर्वच्या सर्व बसस्थानकांचे समितीमार्फत स्वच्छता ऑडिट करून त्यानुसार गुणाकांची नोंद केली जाणार आहे. तसेच त्याबाबतचा एकत्रित अहवाल महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयास सादर केला जाणार आहे.