सातारा : कुसुंबी (ता. जावळी) परिसरातील गाजे गावच्या हद्दीत असलेल्या ‘घरातघर’ या गावामध्ये एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका ३५ वर्षीय गतिमंद (मतिमंद) महिलेवर ५० वर्षीय इसमाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, मेढा पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित महिला ही वय वर्ष ३५ असणारी आणि मानसिकदृष्ट्या गतिमंद आहे. तिचा गैरफायदा घेत ५० वर्षीय संशयित आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार (बलात्कार) केला. या घटनेची माहिती मिळताच परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून मेढा पोलीस ठाण्याच्या पथकाने तत्परता दाखवत घटनास्थळी धाव घेतली. गुन्हा घडल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही वेळातच ५० वर्षीय संशयित आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले आहे.
या दुर्दैवी आणि संतापजनक घटनेचा पुढील सखोल तपास मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील आणि त्यांचे पथक करत आहेत.