सातारा : जागतिक वारसास्थळ असणार्या कास पठारावर युनेस्कोच्या अभ्यासकांची टीम दाखल झाली आहे. या टीमकडून कास पठारावर लुप्त पावत चाललेल्या दुर्मीळ प्रदेशनिष्ठ वनस्पतींची माहिती घेऊन त्यांचे पुनरुर्जीवन कसे करता येईल? याचा अहवाल युनेस्कोला सादर करण्यात येणार आहे.
या टीममध्ये महाराष्ट्रासह राज्याबाहेरील 12 वनस्पती शास्त्रज्ञांचा समावेश आहे. या वर्ल्ड हेरिटेजच्या टीमने कास व परिसरातील ग्रामस्थांशी कासाई मंदिरामध्ये बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार 2012 मध्ये युनेस्कोने कास पठाराला जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केले; परंतु त्या आधीपासून पठारावर अनेक प्रकारच्या प्रदेशनिष्ठ दुर्मीळ वनस्पती अस्तित्वात होत्या. त्यापैकी अनेक जाती लुप्त पावल्या आहेत. त्यांचे संशोधन होणे जरुरीचे आहे. यानंतर या टीमने पठाराची प्रत्यक्षात पाहणी सुरू केली.
कास हा जैवविविधतेचा ‘हॉटस्पॉट’ आहे. या पठारावर ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात फुलणार्या विविध प्रकारच्या रानफुलांसाठी आणि फुलपाखरांसाठी हे पठार प्रसिद्ध आहे.
या पठारावर 280 फुलांच्या प्रजाती व वनस्पती वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून 850 प्रजाती आढळतात. येथे आययुसीएनच्या प्रदेनिष्ठ लाल यादीतील (इंटरनॅशनल युनियन फॉर कंन्झर्वेशन ऑफ नेचर अॅन्ड नॅचरल रिसोर्सेस) यांनी नष्टप्राय होण्याचा धोका असलेल्या घोषित 280 प्रादेशिक प्रजातींपैकी 39 प्रजाती आढळतात. येथे सुमारे 59 जातींचे सरीसृप आढळतात. या सर्वांचा अभ्यास युनेस्कोच्या टीममार्फत केला जात आहे.
टीमने घेतली ही माहिती
विकासकामांमुळे नैसर्गिक स्थितीवर परिणाम होतो का?
प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या संवर्धनाबाबत उपाययोजना
लुप्त वनस्पतींची जागा दुसर्या वनस्पतींनी घेतलीय का?
वाढत्या पर्यटनाचा वनस्पतींवर होणारा परिणाम
लुप्त झालेल्या वनस्पतींचे पुनरुज्जीवन कसे करता येईल?