कोकणाला २४ तासांचा अतिवृष्टीचा अलर्ट

by Team Satara Today | published on : 18 August 2025


मुंबई : राज्यात पुढील २४ तासासाठी मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट आणि कोल्हापूर घाट या भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आपत्तीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (INCOIS) तर्फे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी या जिल्ह्यांना दि.१८ ऑगस्ट २०२५ रात्रौ ११.३० ते दि. २० ऑगस्ट २०२५ रात्रौ ८.३० पर्यंत ३.५ ते ४.३ मीटर तसेच पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना दि. १९ ऑगस्ट २०२५ ८.३० ते दि. २० ऑगस्ट २०२५ रात्रौ ८.३० २० पर्यंत ३.५ ते ४.२ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत समुद्राची स्थिती खवळलेली व ताशी ५०-६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समुद्राची धूप आणि उंच लाटांचे तडाखे समुद्र किनारी येण्याचा इशारा देण्यात आला आहे. सर्व जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

भारतीय हवामान खात्याकडून दि. १७ ते दि. २१ दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून याबाबत नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे. तसेच अधिकच्या अतिवृष्टी इशाऱ्यामुळे भूस्खलनाच्याचाबत सर्व आवश्यक कार्यवाहीसाठी जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आले असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी, शास्त्री, कोदवली या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे तसेच रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून जिल्हा प्रशासना मार्फत सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली आहे. NDRF चे १ पथक बीड तालुका परळी कौडगाव येथे शोध व बचाव कार्यासाठी नियुक्त करण्याच्या अनुषंगाने रवाना करण्यात आले आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे १ पथक नांदेड तालुका मुखेड हळणी गाव येथे नियुक्त केले असून त्या परिसरात कार्यरत आहे.

IMD, NRSC या केंद्रीय संस्था सोबत सतत संपर्क साधून पुढील हवामानाच्या अंदाजाची माहिती घेऊन सर्व जिल्ह्यांना प्रसारित करण्यात येत आहे. तसेच SACHET platform चा वापर करून हवामानाचे अलर्ट नागरिकांपर्यंत SMS /NOTIFICATION च्या माध्यमातून पोहचवण्यात येत असल्याचेही राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दारूच्या व्यसनामुळे तोल जाऊन नदीत बुडून एकाचा दुर्दैवी मृत्यू
पुढील बातमी
पुतीन-ट्रम्प भेटीनंतर रशियाची भारताला मोठी ऑफर

संबंधित बातम्या