मराठा साम्राज्याचा नकाशा वगळल्याच्या निषेधार्थ साताऱ्यात भव्य मोर्चा; जिल्हा प्रशासनाला १५ दिवसांचा 'अल्टीमेटम'

by Team Satara Today | published on : 25 April 2026


सातारा : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) आठवीच्या अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळल्याच्या निर्णयाचे पडसाद आज मराठ्यांच्या ऐतिहासिक राजधानीत उमटले. या निर्णयाच्या निषेधार्थ श्रीमंत छत्रपती वृषालीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली साताऱ्यात भव्य मोर्चा काढण्यात आला. केंद्र सरकारने हा नकाशा पूर्ववत न केल्यास छत्रपती घराण्याच्या वतीने याचिका दाखल करण्यात येईल, असा इशारा देत प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे.

​शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात झाली. पोवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर काढण्यात आलेल्या या मोर्चात 'इतिहास पुसणार नाही, महाराष्ट्र झुकणार नाही' अशा आशयाचे फलक हातात धरून शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान केंद्र सरकार आणि एनसीईआरटीच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.

​या आंदोलनात श्रीमंत छत्रपती वृषालीराजे भोसले यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी, शिवप्रतिष्ठानचे धारकरी, नगरसेवक, मुस्लिम बांधव आणि मोठ्या संख्येने शिवभक्त सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी बोलताना वृषालीराजे भोसले यांनी केंद्र सरकारवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. त्या म्हणाल्या की, मराठा साम्राज्याचा नकाशा वगळणे हा केवळ अभ्यासक्रमाचा विषय नसून महाराष्ट्राच्या अस्मितेवर झालेला आघात आहे. शिवरायांच्या विचारांवर आणि इतिहासावर घाला घालण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. जर १५ दिवसांत हा निर्णय बदलला नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडले जाईल.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी ‘आमने बंगला’ प्रकरणाला गती
पुढील बातमी
नूतन एसपी ॲक्शन मोडवर; पदभार स्वीकारताच जुगार अड्डे उद्ध्वस्त, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दणका

संबंधित बातम्या