कुरुंदकरांच्या सारख्या निर्भीड विचारवंतांची आज गरज

सातारा : नरहर कुरुंदकर यांच्या सारख्या निर्भीड अनेक विचारवंतांची आज महाराष्ट्राला फार मोठी गरज आहे, असे मत ज्येष्ठ संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केले.

नरहर कुरुंदकर विचारमंचच्या वतीने नगर वाचनालयाच्या पाठक हॉल मध्ये 'महाराष्ट्रातील प्रबोधन परंपरा व नरहर कुरुंदकर' या विषयावर विशेष व्याख्यान देताना ते बोलत होते. विचार मंचावर संयोजक, ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ व दिनकर झिंब्रे उपस्थित होते.

लोकशाही प्रगल्भ होण्यासाठी योग्य प्रश्न बेडरपणे विचारणे हे खऱ्या विचारवंतांचे काम आहे. त्याची आज उणीव भासते आहे. नरहर कुरुंदकर यांचा वैचारिक पल्ला अलौकिक व कौतुकास्पद असा होता. आजच्या काळात ते पचले नसते. त्यांचा मोठेपणा असा की ते डावे की उजवे हे शेवटपर्यंत कळत नसे. त्यांनी दोन्हीकडच्यांना खडसावलेले आहे. महाराष्ट्राच्या समाज प्रबोधन परंपरेत त्यांचे स्थान अव्वल दर्जाचे आहे. त्यांच्या अचंबित करणाऱ्या बौद्धिक पल्ल्यात मोठी ताकद दडली आहे. त्याची ओळख नवीन पिढीला होण्याची नितांत गरज आहे. धर्मसत्ता व राजसत्ता ही वेगळी असली पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. आज याबाबतचा व्यवहार चिंताजनक अशा स्वरूपाचा आहे.

आधुनिक समाजामध्ये लोकशाही, स्त्री -पुरुष समता  व मानवी समानता तत्व रुजवावे लागते.  याबाबत महाराष्ट्रातील समाजसुधारकांनी समाज प्रबोधनाचे फार मोठे काम केले आहे. त्याचा आढावा गिरीश कुबेर यांनी यावेळी घेतला.  पश्चिम बंगाल मध्ये राजा राममोहन रॉय यांनी केलेल्या कामाचे काय झाले असा प्रश्न पडतोय. 

रखमाबाई राऊत या महिलेने 'माझ्या शरीरावर माझा अधिकार' सांगण्याचे धाडस १९ व्या शतकात केले. इंग्लंडच्या राणीकडे दाद मागून सुवर्णाक्षराने लिहावा असा संमती वयाचा कायदा करण्यास भाग पाडलेचे त्यांनी यावेळी सांगितले.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांची अलौकिक प्रतिभा आणि दुर्लक्षित कार्य :

डॉ. आंबेडकरांनी विद्यार्थी दशेत रुपयाचे मूल्याबाबतच्या शोधनिबंधात मांडलेल्या गंभीर चिंतनाची दखल घेऊन इंग्लंडच्या सरकारने नेमलेल्या समितीच्या शिफारशी नंतर भारताच्या रिझर्व बँकेची निर्मिती झालेली आहे. याचा विसर पडता कामा नये असे गिरीश कुबेर यांनी डॉ.बाबासाहेबआंबेडकरांच्या गौरवास्पद कामगिरीचा उल्लेख करताना सांगितले. 

किशोर बेडकिहाळ यांनी प्रस्ताविक केले. दिनकर झिंब्रे यांनी आभार मानले. कार्यक्रमास नरहर कुरुंदकर यांचे चाहते तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

मागील बातमी
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांची प्रकृती खालावली
पुढील बातमी
38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, उत्तराखंड 2024-25

संबंधित बातम्या