सातारा : शाहू चौकातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे शासकीय नियम डावलून तो पुतळा खाजगी संस्थेला विकण्यात आल्याचा आरोप मातंग समाज कृती समितीने केला आहे. या पुतळ्याची योग्य काळजी न घेता अधिकाराचा गैरवापर व शासकीय नियम पुढे करून साहित्यरत्न अण्णाभाऊ अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना करून मातंग समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन मातंग समाज कृती समिती सातारा जिल्हा यांच्यावतीने देण्यात आलेले आहे.
या निवेदनावर समिती सदस्य किशोर धुमाळ, प्राध्यापक गणेश वाघमारे, विशाल भोसले, ऋषिकेश गायकवाड, अविनाश तुपे, गणेश गायकवाड, सविता धोत्रे, जयश्री चव्हाण, मंगेश चव्हाण, दीपक म्हसणे, निलेश लोंढे, अभिजीत संकटे, संतोष सावळे, विक्रम गायकवाड, अंकित वाघमारे,विमल शिंदे, तेजस सपकाळ, समीर मुल्ला, संदीप पवार, उज्वला सुतार, विशाल आवळे, अजय पुलावळे, लक्ष्मण पोळ, संदीप पवार, नितीन चव्हाण यांच्या स्वाक्षर्या आहेत.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नवीन पूर्णाकृती पुतळा बसवण्याचे टेंडर काढण्यात आलेले आहे. नियमानुसार शासकीय मान्यता, प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता, आर्थिक मान्यता, बजेट, एकूण खर्च, सर्वमान्यता तसेच सदर टेंडर शासकीय ऑनलाईन प्रणालीवर प्रसिद्ध करण्यात आले होते. यामध्ये किती संस्थांनी भाग घेतला, त्यांनी किती अर्ज दाखल केले या सर्व प्रक्रियेची माहिती मिळावी. अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्या संदर्भात मुख्याधिकारांनी आपल्या मर्जीतील विशिष्ट व्यक्तींची कशी समिती नेमली आहे? यामागे आर्थिक हितसंबंध जोपासण्याचे काम केले आहे का ?अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे गार्डन येथील जुने बांधकाम पाडण्यात आले. त्यामध्ये लोखंडी साहित्य, विटा, फरशी त्या साहित्याचा पंचनामा करून ते कुठे ठेवले आहे? त्याचा पंचनामा अहवाल ठेवण्यात आला आहे का? असे विविध प्रश्न या निवेदनात उपस्थित करण्यात आलेले आहेत. या संदर्भात योग्य ती चौकशी करून संबंधितांस अहवाल अवगत केला जाईल, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.