कराडच्या यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाच्या उदघाटनास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती; २४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान सहा दिवस प्रदर्शन

by Team Satara Today | published on : 23 November 2026


कराड : आधुनिक शेती तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण कृषी प्रयोग आणि पशुपक्ष्यांच्या अनोख्या विश्वाची माहिती देणाऱ्या कराड येथील २१ व्या यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली आहे. उद्या (मंगळवारी) शेतकऱ्यांच्या हस्ते प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन होईल. तर, बुधवारी (ता. २५) सकाळी नऊ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मुख्य उद्घाटन सोहळा होईल, अशी माहिती बाजार समितीचे सभापती सतीश इंगवले, उपसभापती नितीन ढापरे, संचालक प्रकाश पाटील यांनी आज दिली.
लोकनेते विलासकाकांनी सुरू केलेली कृषी प्रदर्शनाची परंपरा ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीने पुढे सुरू ठेवल्याचे सांगून उपसभापती ढापरे म्हणाले, बाजार समितीच्या वतीने २४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान सहा दिवस हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. राज्यावर दुष्काळाचे सावट असल्याने यंदा पीक आणि पाणी व्यवस्थापनावर भर दिला आहे.
पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे डॉ. किरण ओंबासे यांचे दुष्काळसदृश्य परिस्थितीतील ऊस पीक व्यवस्थापन, तर कृषितज्ज्ञ निलेश थोरात यांचे चारा पिकांच्या लागवडीबाबत मार्गदर्शन होईल. ऊस शेतीतील एआय तंत्रज्ञान आणि सेंद्रिय शेतीवरही परिसंवाद आयोजित केले आहेत. प्रदर्शनात फुले, गाय-म्हैस-बैल, केळी घड, फळे, ऊस, भाजीपाला स्पर्धा, शेळी-मेंढी प्रदर्शन आणि डॉग शो आयोजित केला आहे. बारा प्रगतशील शेतकऱ्यांना शेतीनिष्ठ पुरस्काराने गौरविण्यात येईल.
उत्कृष्ट भाजीपाला व गूळ उत्पादकांचाही सन्मान होईल. प्रदर्शनासाठी जर्मन हँगर पद्धतीचा डोम उभारला असून, स्थानिक शेतकरी, बचत गट आणि विविध संस्थांना शंभर स्टॉल मोफत उपलब्ध करून दिले आहेत. वाहनांसाठी भाजीपाला मार्केटमध्ये मोफत पार्किंगची व्यवस्था केली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष नियोजन केले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी, कृषीप्रेमी, विद्यार्थी व नागरिकांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती इंगवले यांनी केले.
याक, साडेचार फुटी सरड्याचे आकर्षण
यंदाच्या कृषी प्रदर्शनात दुष्काळी परिस्थितीतील शेती व्यवस्थापन, ऊस पिकासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती आणि चारा पिकांच्या लागवडीवर विशेष मार्गदर्शन देण्याची व्यवस्था केली आहे. यंदा हिमालयातील याक आणि साडेचार फुटी सरडा हे प्रदर्शनातील खास आकर्षण असेल, असेही सभापती इंगवले यांनी सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची समिती महाराष्ट्र दौऱ्यावर; सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाची होणार गुणवत्ता तपासणी
पुढील बातमी
महाबळेश्वरमध्ये निकृष्ट कामाचा नमुना, चार महिन्यांतच खचला काँक्रिट रस्ता; शिंदे गटाचे विभागप्रमुख हेमंत साळवी यांनी उठवला आवाज

संबंधित बातम्या