सातारा : आगामी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने सातारा जिल्ह्यात संघटनात्मक ताकद वाढविण्याच्या हालचालींना वेग दिला आहे. मुंबईतील शिवसेना भवन येथे सोमवारी झालेल्या पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सातारा जिल्ह्यातील पक्षबांधणीसह आगामी निवडणुकांसाठी बूथपातळीवरील यंत्रणा मजबूत करण्यावर भर देण्यात आला.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, नेत्या ॲड. सुषमा अंधारे, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक उद्धव कदम यांच्यासह वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मतदार याद्यांची तपासणी, BLA नियुक्ती आणि स्थानिक पातळीवरील संघटनात्मक जबाबदाऱ्यांवर चर्चा झाली.
सातारा जिल्ह्यात सहकार क्षेत्राला असलेले राजकीय महत्त्व लक्षात घेता जिल्हा बँकेची निवडणूक ठाकरे गटासाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्याचवेळी ग्रामपंचायत निवडणुकांच्या माध्यमातून गावागावांत पक्षाचा प्रभाव वाढविण्याचे आव्हानही पक्षासमोर आहे.
यासाठी केवळ पदाधिकाऱ्यांपुरती मर्यादित संघटना न ठेवता मतदारांपर्यंत थेट पोहोचण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत जनसंपर्क वाढविण्याचे संकेतही देण्यात आले. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात ठाकरे सेनेच्या राजकीय हालचालींना वेग येण्याची चिन्हे आहेत.
ठाकरे सेनेचा साताऱ्यात ‘बूथ टू व्हिलेज’ फॉर्म्युला; जिल्हा बँक, ग्रामपंचायत निवडणुकांसाठी संघटनात्मक वाढविण्यासाठी वेग; मुंबईतील बैठकीत साताऱ्यावर विशेष लक्ष
by Team Satara Today | published on : 09 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा