सातारा : वैचारिक साहित्याची निर्मिती न होणे हे समाजाच्या वैचारिक अधोगतीचे लक्षण आहे. ज्या समाजात वैचारिक साहित्य उपलब्ध नसलणे हे विचार प्रक्रिया खुंटल्याचे लक्षण आहे. त्यामुळे त्याचा परिणाम बुध्दीप्रामाण्यवाद, विवेक निष्ठा याच्यावर होता त्यामुळे वैचारिक साहित्य निर्माण होणे ही काळाची गरज आहे. ते निर्माण झाले पाहिजे आणि अधिक वाचले गेले पाहिजे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्ये अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.
येथील नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये मसाप, शाहुपुरी शाखेच्या वतीने वर्धापनादिनानिमित्त जिल्हयातील विविध साहित्यकांना पुरस्कार जाहीर करण्यात आले होते त्याचे वितरण प्रा. मिलिंद जोशी आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी प्रा. जोशी बोलत होते. व्यासपीठावर महामंडळाच्या कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, ज्येष्ट साहित्यिक किशोर बेडकिहाळ, डॉ.उमेश करंबेळकर आणि मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रा. जोशी पुढे म्हणाले, शाहुपुरी शाखेला १४ वर्षे पूर्ण झाली असून त्याचा वनवास संपलेला आहे असे म्हणालयला हरकत नाही. त्यांच्या नशिबी अज्ञातवास नाही. या शाखेचे कार्य हे राज्यातील सर्व शाखांना मार्गदर्शक आहे. केंद्रीय शाखेने जिल्हा शाखांना काहीतरी द्यावे असे अपेक्षित असते परंतु शाहुपुरी शाखेने नेहमीच केंद्रीय शाखेला विविध उपक्रम, दिशा दाखवण्याचे काम केले आहे. मराठी अभिजात भाषेच्या दर्जासाठी १ लाख पत्रे लिहिणे असो, दिल्लीतील धरणे आंदोलन असो, विविध राजकीय नेत्यांची भेटी असो हे सगळे काम शाहुपुरी शाखेने केले आहे. त्यांच्या पाठीशी विनोद कुलकर्णी यांच्यासारखे खमके नेतृत्व आहे. सध्या समाजात वैचारिक साहित्याची निर्मिती होण्याचे प्रमाण कमी असून हे विचार प्रक्रिया खुंटल्याचे लक्षण आहे. वैचारिक प्रक्रिया निर्मिती हे अनेक वर्षे चालत आलेली आहे. ती खुंटते तेव्हा समाजाची एकांगी प्रगती होते, त्याचंच प्रतिबिंब आज समाजात दिसते. त्यामुळे वैचारिक साहित्य निर्मिती होणे ही काळाची गरज आहे. यावेळी त्यांनी ज्येष्ठ साहित्यिक किशोर बेडकिहाळ, मसाप, शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, कृतज्ञता पुरस्कार मिळालेले श्रीनिवास कुलकर्णी तसेच सर्व पुरस्कार विजेत्यांचे कौतुक केले.
यावेळी बोलताना महामंडळाच्या कार्यवाह सुनिताराजे पवार यांनी शाहुपुरी शाखेच्या कार्याचे कौतुक करत या शाखेचा अभिमान असल्याचे सांगितले. शाखेच्या या उपक्रमामुळे त्या त्या जिल्हयातील साहित्यिकांना व्यासपीठ मिळत असून पुरस्कार मिळालेल्यांचे कौतुक केले. महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी शाहुपुरी शाखेच्या कार्याचा आढावा घेतला. विविध उपक्रम कसे राबवले, त्या राबवताना काय अडचणी आल्या, त्यावर कशी मात केली याबाबत सांगितले. तसेच पुरस्कार देण्याचा उपक्रम कायमस्वरुपी रहावा यासाठी कशाप्रकारे तरतूद करण्यात आली आहे याची माहिती दिली. मी महामंडळाचा कोषाध्यक्ष, मसापचा कोषाध्यक्ष झालो असलो तरी मला त्यापेक्षा शाहुपुरी शाखेचा संस्थापक असल्याचा जास्त अभिमान असल्याचे सांगितले.
प्रारंभी संयोजकांच्यावतीने महामंडळावर निवड झालेल्या प्रा. मिलिंद जोशी, सुनिताराजे पवार, विनोद कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मान्वरांच्या हस्ते श्री. छ.थोरले प्रतापसिंह महाराज ज्येष्ठ साहित्यिक कृतज्ञता पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना, उत्तम बंडु तुपे कादंबरी पुरस्कार विद्या पोळ-जगताप यांना, प्रा. अजित पाटील कथा पुरस्कार पदमाकर पाठकजी यांना, बा. सी. मर्ढेकर कविता पुरस्कार निलेश महिगावकर यांना, वासंती मुजुमदार संकीर्ण साहित्य पुरस्कार डॉ. मोहन सुखटणकर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी युपीएससी परीक्षेत रँक आलेल्या संकेत शिंगटे, प्रणव कुलकर्णी यांचाही मसाप, शाहुपुरी शाखेतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त केले तसेच पुरस्कार दिल्याबद्दल विद्या पोळ, पद्माकर पाठक, निलेश महिगावकर, डॉ.मोहन सुकटणकर या पुरस्कारा विजेत्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी परीक्षकांचाही सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन नंदकुमार सावंत यांनी केले तर आभार ॲड. चंद्रकांत बेबले यांनी मानले. याप्रसंगी अजित कुबेर, ॲड. चंद्रकांत बेबले, अजित साळुंखे, वजीर नदाफ, सचिन सावंत, मुकुंद फडके, डॉ. राजेंद्र माने, संजय माने, अरविंद शिंगटे, डॉ.बाबा सुखटणकर, मानसी लाटकर, साताऱ्यातील साहित्यप्रेमी आणि सातारकर उपस्थित होते.