तारगावची ग्रामसभा ठरली वादळी; तरुणाईच्या प्रश्नांनी सत्ताधाऱ्यांची दमछाक, अनेक प्रश्न अनुत्तरित राहिल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी

by Team Satara Today | published on : 22 August 2026


तारगाव  : तारगाव, ता. कोरेगाव ग्रामपंचायतीची आज झालेली ग्रामसभा विविध प्रश्नांवरील तीव्र चर्चेमुळे चांगलीच वादळी ठरली. ग्रामस्थांनी विशेषतः नव्या तरुण पिढीने गावाच्या विकासाशी संबंधित विविध प्रश्न उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना जाब विचारला. काही प्रश्नांना सत्ताधाऱ्यांकडून उत्तरे देण्यात आली; मात्र अनेक प्रश्न अनुत्तरित राहिल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले.

ग्रामसभेस जिल्हा परिषदेच्या सदस्या तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसभेच्या सुरुवातीपासूनच गावातील विविध विकासकामे, त्यांची अंमलबजावणी, निधीचा वापर, नागरिकांच्या समस्या आणि ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले.

विशेषतः तरुण ग्रामस्थांनी थेट आणि स्पष्ट शब्दांत प्रश्न उपस्थित केल्याने ग्रामसभेतील वातावरण अधिकच तापले. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर सत्ताधारी गटाकडून काही मोजक्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली. मात्र चर्चेदरम्यान विरोधकांकडून झालेल्या तिखट प्रश्नोत्तरांमुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले.

दरम्यान, सत्ताधारी गटातील काही पदाधिकारी व सदस्य ग्रामसभा संपण्यापूर्वीच निघून गेल्याने ग्रामस्थांमध्ये चर्चेला उधाण आले. त्यानंतर उपस्थित विरोधक व ग्रामस्थांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. ग्रामसभेतील प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याची भावना काही ग्रामस्थांनी व्यक्त केली. “गावातील प्रश्न विचारणे हा प्रत्येक ग्रामस्थाचा अधिकार असून, प्रश्न विचारणाऱ्या तरुण पिढीला समाधानकारक उत्तरे मिळणे आवश्यक आहे,” अशी भावना यावेळी अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केली. नव्या पिढीने गावाच्या कारभाराबाबत दाखविलेली जागरूकता ही ग्रामविकासाच्या दृष्टीने महत्त्वाची बाब असल्याचेही बोलले जात होते.

तारगावच्या  इतिहासात प्रथमच एवढी वादळी ग्रामसभा

तारगावच्या ग्रामसभेत यावेळी जुन्या अनुभवी नेत्यांसमोर नव्या तरुणाईने थेट प्रश्नांची सरबत्ती केल्याचे चित्र पाहायला मिळाले. परिणामी अनुभवी नेत्यांचीही काही वेळा दमछाक झाल्याचे वातावरणातून जाणवत होते. त्यामुळे तारगावच्या राजकीय व सामाजिक इतिहासात ही ग्रामसभा प्रथमच एवढी वादळी ठरल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगली आहे.

ग्रामसभा पूर्ण वेळ चालून सर्व विषयांवर चर्चा होणे अपेक्षित असताना काही पदाधिकारी व सदस्य निघून गेल्यामुळे ग्रामसभा अर्धवट स्वरूपात संपल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त करण्यात आली. आता उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर ग्रामपंचायत प्रशासन आणि सत्ताधारी गट पुढील काळात काय भूमिका घेतात, याकडे तारगाव ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागरातील जलाचे पूजन
पुढील बातमी
महिला देशाची सर्वात मोठी ताकद..! पुण्यात राहुल गांधींचा मनुस्मृतीवर निशाणा, सामाजिक व्यवस्थेवरही केले भाष्य

संबंधित बातम्या