सातारा : सातारा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारे ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रयत्नातून दोन महत्वाच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यासाठी तब्बल १२४ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला. याशिवाय त्यांनी मेढा नगरपंचायत हद्दीतील स्मशानभूमी विकसित करणे व अनुषंगिक कामे करण्यासाठी २ कोटी ३० लाख रुपये निधी मंजूर करून घेतला आहे. यामुळे सातारा व मेढा या दोन्ही शहराच्या विकासाला बूस्टर मिळाला आहे.
सातारा शहरातील आणि मेढा नगरपंचायत हद्दीतील विविध विकासकामांसाठी भरीव निधी उपलब्ध व्हावा यासाठी ना. शिवेंद्रराजे यांनी काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री शिंदे यांची त्यांच्या दरे येथील निवासस्थानी भेट घेतली होती. ना. शिवेंद्रराजेंनी सुचवलेल्या कामांना ना. शिंदे यांनी नगर विकास विभागाकडून भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. सातारा शहरातील दोन रस्ते नव्याने खोदून दर्जेदार काँक्रीटीकरण करणे, सर्व्हिस डक्ट, नवीन पाणीपुरवठा पाईपलाईन, अंडरग्राऊंड विद्युत केबल्स, पथदिवे बसवणे आदी कामे करण्यासाठी १२४ कोटी ८६ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.
यामध्ये सातारा बस स्थानकाशेजारील सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती ते कोटेश्वर मंदिर पर्यंतचा रस्ता (राधिका रोड) विकसित करणे ७०.६० कोटी आणि राजपथावरील शाहू चौक ते राजवाडा गोलबाग चौक पर्यंत रस्ता विकसित करणे ५४.२६ कोटी या दोन रस्त्यांचा समावेश आहे. भू विकास बँक ते जुना आरटीओ चौक रस्त्याच्या धर्तीवर या दोन्ही रस्त्यांचे काम होणार आहे. मेढा नगरपंचायत हद्दीतील स्मशानभूमीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. यासाठीच्या जमिनीचा प्रश्न ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी यापूर्वीच मार्गी लावला होता. या स्मशानभूमीच्या विकासासाठी २.३० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून स्मशानभूमी परिसर विकसित करणे, सुशोभीकरण, पोहोच रस्ता, लोकांसाठी बसण्याची व्यवस्था, पाणी टाकी, तसेच अनुषंगिक कामे करण्यात येणार आहेत.
साताऱ्यातील राजपथ, राधिका रोडसाठी १२४.८६ कोटी; ना. शिवेंद्रराजे भोसले यांचा धडाका, मेढा नगरपंचायत हद्दीतील कामे करण्यासाठी २ कोटी ३० लाख रुपये निधी
by Team Satara Today | published on : 21 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा