सातारा : सातारा जिल्हा भाजप कार्यकारिणीच्या वतीने कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या आरक्षण विरोधी वक्तव्याचा निषेध करण्यात आला. येथील शाहू चौकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हा निषेध करण्यात आला. तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कॉंग्रेसचे महासचिव व ज्येष्ठ नेते राहुल गांधी हे सध्या अमेरिकेच्या दौर्यावर आहेत. या दौर्यामध्ये राहुल गांधी यांनी भारतामध्ये आरक्षणासारखी परिस्थिती उरलेली नाही, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे संपूर्ण देशासह महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यकारिणीने या वक्तव्याचा निषेध करत येथील शाहू चौकामध्ये धरणे आंदोलन केले. तसेच राहुल गांधी यांच्या प्रतिमेवर फुली मारून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. याचवेळी त्यांच्या निषेधाचे वेगवेगळे फलक कार्यकर्त्यांनी यावेळी झळकवले. जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्यासह शहराध्यक्ष विकास गोसावी, राहुल शिवनामे, माजी नगरसेवक धनंजय जांभळे इत्यादी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
राहुल गांधी यांचे वक्तव्य हे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अपमान करणारे आहे. कॉंग्रेस पक्ष आरक्षण विरोधी, अशा विविध निषेधाच्या फलकांनी हे आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शाहू चौकामध्ये ठिय्या देत धरणे आंदोलन केले. यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सातारा जिल्हा भाजपच्या वतीने राहुल गांधी यांचा निषेध
by Team Satara Today | published on : 13 September 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा