सातारा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सातारा तालुक्यातील खेड गावच्या हद्दीत टीव्हीएस शोरूमसमोर डंपर चालकाने इंडिकेटर न देता अचानक महामार्गावर डंपर वळवल्याने दुचाकीची डंपरला पाठीमागून धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार महादेव किसन दिघे (वय - 61, रा. आंबेघर, ता. जावळी, जि. सातारा) यांचा मृत्यू झाला होता. ही घटना 8 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात 13 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव दिघे हे त्यांच्या ताब्यातील दुचाकीवरून पुणे ते कोल्हापूर जाणार्या महामार्गावरून प्रवास करत होते. त्याचवेळी हा डंपर वाढे फाटा ते बॉम्बे रेस्टॉरंटकडे जाणार्या सर्व्हिस रोडवरून येत होता. डंपर चालकाने इंडिकेटर न देता अचानक डंपर महामार्गावर घेतल्याने दिघे यांच्या दुचाकीची डंपरला पाठीमागून धडक बसली. या अपघातात दिघे यांच्या डोक्याला व चेहर्याला गंभीर दुखापत झाली. त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या प्रकरणी गेनबा रासकर (वय 40, रा. काशिदवाडी, ता. फलटण, जि. सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सातारा शहर पोलीस करीत आहेत.
महामार्गावर सातारा तालुक्यातील खेड गावच्या हद्दीत डंपरची दुचाकीला धडक; वृद्धाचा मृत्यू
by Team Satara Today | published on : 14 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा