अजिंक्यतारा किल्ल्यावर कायमस्वरूपी पोलीस चेकपोस्ट उभारण्याची मागणी; शिवप्रतिष्ठान हिन्दुस्तानचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

by Team Satara Today | published on : 05 March 2026


सातारा  : ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ला येथे वाढत चाललेल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कायमस्वरूपी पोलीस चेकपोस्ट उभारण्याची मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत संघटनेचे जिल्हाप्रमुख सतीश बापू ओतारी यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाला निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, ऐतिहासिक महत्त्व असलेला अजिंक्यतारा किल्ला हा हिंदवी स्वराज्याची चौथी राजधानी मानला जातो. छत्रपती शाहू महाराज यांनी याच किल्ल्यावरून राज्यकारभार चालवला होता, तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने हा गड पावन झाला आहे. त्यामुळे या किल्ल्याला मोठे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे.

मात्र सध्या किल्ल्यावर प्रेमी युगुलांचे वाढते प्रमाण, दारू पिणे, अश्लील प्रकार तसेच अमली पदार्थांचे सेवन यामुळे गडाचे पावित्र्य धोक्यात आले आहे. परिसरात दारूच्या बाटल्या, गांजाच्या पुड्या, इंजेक्शन तसेच इतर साहित्य आढळत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय यापूर्वी किल्ल्यावर काही आत्महत्यांच्या घटना देखील घडल्याचे सांगण्यात आले.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांकडून गडकोट स्वच्छता मोहीम आणि खडा पहारा अशा उपक्रमांद्वारे गडाची स्वच्छता व देखभाल केली जात असली, तरी कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था नसल्याने समस्या वाढत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

म्हणून किल्ल्याच्या पायथ्याशी मंगळाई देवी मंदिर परिसरात कायमस्वरूपी पोलीस चेकपोस्ट व बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी संघटनेचे अभिजीत बारटक्के, अजिंक्य गुजर, अमोल खोपडे, ऋषिकेश मतकर आणि शुभम शिंदे उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अंबर ग्रीसच्या तस्करीप्रकरणी सात जण ताब्यात; पाच किलो 304 ग्रॅमची उलटी जप्त, महाबळेश्वर वन विभागाची कारवाई
पुढील बातमी
महा अ‍ॅप्टिकॉन परिषदेचे साताऱ्यात उद्या उद्घाटन; खासदार उदयनराजे भोसले व आमदार महेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती: पाच जिल्ह्यातून तेराशे प्राध्यापक येणार

संबंधित बातम्या