खटाव-माणच्या पाण्याला विरोध कराल तर रस्त्यावर उतरू

उरमोडीच्या बंदिस्त पाइपलाइनवरून माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर आक्रमक; विरोधकांना राजकीय परिणामांचा इशारा

by Team Satara Today | published on : 27 November 2026


सातारा : उरमोडी धरणाचे पाणी बंदिस्त पाइपलाइनद्वारे खटाव आणि माण तालुक्याला देण्याच्या निर्णयाला होणाऱ्या विरोधाविरोधात माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. खटाव-माणच्या हक्काच्या पाण्याला विरोध करणाऱ्यांविरोधात प्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि संबंधित नेत्यांना खटाव तालुक्यातून एकही मत मिळू दिले जाणार नाही, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.
राज्य शासनाने धरणांचे पाणी खुल्या कॅनॉलऐवजी बंदिस्त पाइपलाइनद्वारे वितरित करण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत महत्त्वाकांक्षी आहे. या पद्धतीमुळे पाण्याची गळती आणि बाष्पीभवनामुळे होणारा अपव्यय टळून प्रत्यक्ष सिंचन क्षेत्रात मोठी वाढ होणार आहे. उरमोडी धरण पूर्ण झाल्यापासून आजतागायत या प्रकल्पाला स्वतःचा मुख्य कॅनॉल उपलब्ध झालेला नाही. खटाव आणि माण तालुक्याला उरमोडीचे पाणी बंदिस्त पाइपलाइनने मिळावे, यासाठी आपण यापूर्वी अनेक आंदोलने केली आहेत. कागदोपत्री ही आठमाही योजना असली, तरी या दुष्काळी भागाला वर्षातून केवळ एक ते दोन वेळाच अत्यंत अपुरे पाणी मिळत असल्याची वस्तुस्थिती डॉ. येळगावकर यांनी मांडली.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून उरमोडीचे पाणी बंदिस्त पाइपलाइनद्वारे नेण्याच्या कामाला शासनाची मंजुरी मिळवली असून, या कामाची निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. असे असताना, नुकत्याच पार पडलेल्या सातारा जिल्हा परिषदेच्या बैठकीत ऐनवेळचा विषय घेऊन सदस्यांची मते विचारात न घेता या पाइपलाइनला विरोध दर्शवण्यात आला. त्यापाठोपाठ कोरेगाव पंचायत समितीनेही अशाच स्वरूपाचा विरोधाचा ठराव मंजूर केला. या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ठरावांचा आपण जाहीर निषेध करत असल्याचे डॉ. येळगावकर यांनी स्पष्ट केले.
सातारा जिल्ह्यातील मंजूर गावांना या बंदिस्त पाइपलाइनमधून ठिकठिकाणी आउटलेट काढून पाणी देण्यास आपला कोणताही विरोध नाही. मात्र, ही बंदिस्त पाइपलाइनच होऊ देणार नाही अशी आडमुठी भूमिका कोणी घेत असेल, तर ती अजिबात खपवून घेतली जाणार नाही. सध्या उरमोडीचे पाणी कोंबडवाडीपर्यंत आणणारा कण्हेर कॅनॉल पूर्णपणे जीर्ण झाला असून, तो वारंवार फुटत असल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. कोंबडवाडीपासून खटाव-माणच्या हक्काचे पाणी गेल्या अनेक वर्षांपासून सांगली जिल्ह्याकडे वाहून जात असताना, पाइपलाइनला विरोध करणाऱ्या नेत्यांनी या गंभीर बाबीकडे कधी लक्ष दिले आहे का, असा परखड सवाल त्यांनी उपस्थित केला.
कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद भूषवत असलेल्या कोरेगावच्या आमदारांनी राज्य शासनाच्याच या महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्पाला विरोध करणे हे राजकीय आणि प्रशासकीयदृष्ट्या योग्य नाही. खटाव-माणच्या पाणीप्रश्नाबाबत त्यांनी आपली भूमिका तातडीने स्पष्ट करावी, अशी मागणीही डॉ. येळगावकर यांनी केली आहे.
दरम्यान, गुरुवर्य कै. लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर उपसा सिंचन योजना ही प्रामुख्याने खटाव आणि माण तालुक्यांसाठी आखलेली असतानाही, ती केवळ चारमाही ठेवण्यात आल्याने या भागातील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होत आहे. ही योजना आठमाही करण्यासाठी संबंधितांनी ठोस प्रयत्न का केले नाहीत, असा प्रश्न त्यांनी विचारला. याशिवाय, नेर धरणातून उत्तर खटावसह परिसरातील विविध गावांना पाणी देण्याचा प्रस्ताव आपण यापूर्वीच मंजूर करून घेतला होता. मात्र, गेल्या सात वर्षांत हे काम अद्याप अपूर्ण का राहिले, याचे उत्तर संबंधित लोकप्रतिनिधींनी जनतेला द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. जिहे-कठापूर योजनेत येरळवाडी आणि राजेवाडी या दोन्ही धरणांचा समावेश करून त्यांना हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी आपला संघर्ष यापुढेही अखंड सुरूच राहील, असा निर्धारही डॉ. दिलीप येळगावकर यांनी व्यक्त केला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
डिलिमिटेशन विधेयक व महिला आरक्षणाचा काहीही संबंध नाही, ही फसवेगिरीच; इंदिरा गांधी, वाजपेयी यांनी एकच निर्णय घेतला, नाहीतर..; ५० वर्षांचा इतिहासच पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितला
पुढील बातमी
संविधान दिनी भिमाईंच्या नावाने उद्यानाची ओळख; सदर बाजारच्या नागरिकांचा दीर्घ लढा यशस्वी

संबंधित बातम्या