सातारा : अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने त्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात दि. २० मे २०२६ रोजी औषध दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले असून, या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता व संयम राखावा, तसेच आवश्यक औषधे व वैद्यकीय साहित्याची आगाऊ व्यवस्था करून ठेवावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.
अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, सातारा येथील सहाय्यक आयुक्त रु. वि. पोंगळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बंदच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यातील बहुतांश औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, शासकीय रुग्णालये, आपत्कालीन वैद्यकीय सेवा तसेच काही निवडक औषध दुकाने सुरू राहणार आहेत. सातारा जिल्ह्यातील मेडप्लस, वेलनेस फॉरएव्हर, संघटनेने घोषित केलेली काही औषध दुकाने, रुग्णालय संलग्न औषध दुकाने तसेच जेनेरिक औषध दुकाने नियमितपणे सुरू राहतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
औषध दुकानदारांना दिलेले परवाने हे औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत विविध अटी व नियमांच्या अधीन राहून मंजूर करण्यात आलेले आहेत. रुग्णांना वेळेवर औषधे उपलब्ध करून देणे हा त्यामागील मुख्य उद्देश असल्याने बंदच्या काळात औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा तसेच इतर लागू कायदे आणि आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगून सर्व केमिस्ट बांधवांनी बंदमध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहन सहाय्यक आयुक्त रु. वि. पोंगळे यांनी केले आहे.
दरम्यान, नागरिकांना औषधांची अनुपलब्धता भासल्यास किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास खालील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे : १) श्री. रु. वि. पोंगळे, सहाय्यक आयुक्त (औषधे), सातारा जिल्हा – ९७३००८५५८८, २) श्री. वि. वि. पाटील, औषध निरीक्षक, सातारा – ९१५८८२०७८५ येथे संपर्क साधावा.