संजय राऊतांविरोधात सरसेनापती हंबीरराव मोहितेंचे वंशज आक्रमक

by Team Satara Today | published on : 08 March 2025


कराड : राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या मोहिते नावाच्या महिलेचा सरसेनापती हंबीरराव मोहिते घराण्याची संबंध जोडणाऱ्या एका युट्यूब चॅनेलसह शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज व तळबीड येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

कराड तळबीड पोलीस ठाण्यात संबंधित युट्यूब संपादकावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तळबीडमधील हंबीरराव मोहिते यांच्या समाधीसमोर यूट्यूब चॅनेलसह खासदार संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच बदनामी करणाऱ्यांवर दहा कोटीचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे देखील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या वंशजांनी सांगितले आहे.

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज राजेंद्र मोहिते म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर ज्या महिलेने आरोप केले, त्या महिलेचा तळबीड किंवा सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्याची कुठलाही संबंध नाही. परंतु, एक युट्यूब चॅनेल आणि खासदार संजय राऊत यांनी कुठलीही माहिती न घेता या प्रकरणाशी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे नाव जोडण्याचा प्रयत्न केला.

यामुळे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची बदनामी झाली आहे. त्यामुळे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या वंशजांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. जसे सरसेनापतींच्या वंशजांचे मन दुखावले तसेच महाराष्ट्राच्या जनतेचे एखील मन दुखावले आहे. याबद्दल त्यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी. त्यांच्यावर आम्ही दहा कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार आहे, असे राजेंद्र मोहिते यांनी म्हटले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कांदाटी खोऱ्यातील प्रलंबित विकास कामे गतीने पूर्ण करावीत : जिल्हाधिकारी संतोष पाटील
पुढील बातमी
गृहिणींना दिलासा लसूणच्या किंमतीत घट

संबंधित बातम्या