दिव्यांगांचा संताप अनावर! जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत लोटांगण; पोलिसांशी शाब्दिक चकमक

by Team Satara Today | published on : 02 July 2026


सातारा : विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या दिव्यांग बांधवांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अभूतपूर्व आंदोलन छेडले. आंदोलनकर्त्यांनी कार्यालयापासून थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या मिटिंग हॉलपर्यंत लोटांगण घालत मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. या वेळी पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केल्याने आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वादही झाला.

दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष अजय पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाचा हा तिसरा दिवस होता. मुसळधार पावसातही आंदोलन सुरू ठेवत दिव्यांगांनी आपल्या मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली. अमोल निकम, प्रशांत बगले, शैलेंद्र बोर्डे, लतिका जगताप यांच्यासह अनेक दिव्यांग कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले.

दिव्यांगांना सरकारी नोकरीत संधी, एसटी बसच्या तिकीट रांगेत प्राधान्य, तसेच खेड येथील लतिका जगताप यांच्या घरकुल व शासकीय जागेवरील अतिक्रमणाचा प्रश्न तातडीने सोडवावा, या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. मात्र प्रशासनाकडून ठोस प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलनकर्त्यांनी लोटांगण आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.

आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील आणि नायब तहसीलदार कदम यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र "जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याशीच चर्चा करणार" या भूमिकेवर आंदोलनकर्ते ठाम राहिले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

अखेर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत बहुतांश मागण्यांवर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला लवकरात लवकर लेखी आदेश देण्याची मागणी केली.

दरम्यान, लतिका जगताप यांच्या प्रकरणात प्रशासनाने सुरुवातीलाच ठोस भूमिका घेतली असती, तर आंदोलन इतके तीव्र झाले नसते, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी करत प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा नगरवाचनालयाच्या पाठक सभागृहाचे दर वाढले; सांस्कृतिक व साहित्यिक वर्तुळात चर्चा
पुढील बातमी
स्मार्ट मीटर सक्तीविरोधात सातारकरांचा जनआक्रोश मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, सरकारला आंदोलनाचा इशारा

संबंधित बातम्या