सातारा : क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्थापन केलेले सातारचे प्रतिसरकार सर्वसामान्यांच्या हिताचे आणि ब्रिटिशधार्जिण्या शोषकांच्या विरोधात होते. क्रांतिसिंहांसारखे चारित्र्यसंपन्न राजकारणी व समाजकारणी निर्माण करण्याचा ध्यास घेणे, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल, असे मत स्तंभलेखक व साहित्यिक संपतराव मोरे यांनी केले.
क्रांतिसिंह नाना पाटील यांचे 125 वे जयंती वर्ष आणि सातारा येथे होणार्या 15 व्या विद्रोही साहित्य संमेलनानिमित्त विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्यावतीने संपतराव मोरे यांचे ‘आमचा स्वाभिमान - सातारचे प्रतिसरकार’ या विषयावरील व्याख्यान, क्रांतिसिंह नाना पाटील यांचे सहकारी असलेल्या जिजाबा मोहिते महाराजांची कन्या व क्रांतिसिंहांचा सहवास लाभलेल्या श्रीमती विजयाताई जाधव यांचा सत्कार नुकताच सातारा येथे झाला.
गाडगे महाराज मिशनचे चेअरमन मधुसूदन मोहिते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. सुहास फडतरे महाराज अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे प्रवक्ते विजय मांडके होते. डॉ. सुहास महाराज म्हणाले, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी वारकरी संत व सत्यशोधकी चळवळीचा विचार घेऊन, समतेचे विचार समाजात रुजवण्याचे काम केले. शोषकांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी प्रतिसरकार स्थापन केले. अंधश्रद्धा निर्मूलनाचेही काम केले. कर्मवीर आणि गाडगे महाराजांना आदर्श मानून, समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी श्रीमती विजयाताई जाधव यांचा शाल, पुस्तक व क्रांतिसिंह नाना पाटील यांचे छायाचित्र देऊन, डॉ. सुहास फडतरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. विजय मांडके यांनी प्रास्ताविक केले. प्रा. गौतम काटकर यांनी सूत्रसंचालन केले. शिवराम ठवरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास जिजाबा मोहिते महाराजांचे कुटुंबीय, समविचारी संघटना आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते.