घाटाई मंदिर परिसरात रानगव्यांचे दर्शन

पर्यटकांमध्ये घबराटीचे वातावरण

by Team Satara Today | published on : 20 October 2025


सातारा : सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू असतानाच शनिवारी सायंकाळी सातारा- कास नजिक असणाऱ्या घाटाई मंदिराजवळ रानगव्यांनी दर्शन दिल्यामुळे पर्यटकांची चांगलीच भंबेरी उडाली. अचानक रानगवे समोर आल्यामुळे पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले.

कास पठार हे जागतिक वारसा स्थळ म्हणून समजले जाते. येथील कास जलाशय, मुबलक नैसर्गिक साधन संपत्ती, पठारावर अंथरलेली धुक्याची झालर आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत कास पठारावर फुलणारा अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा फुलोत्सव पाहण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश- विदेशातून पर्यटक येत असतात. यावर्षी सातारा जिल्ह्यात पावसाने उच्चांक गाठल्यामुळे कास पठारावरील फुलांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक कास पठाराला भेट देऊन फुलोत्सवाचा आनंद लुटत आहेत. कास पठाराच्या अलीकडे सातारा- कास मार्गापासून काही अंतरावर घाटाई देवीचे मंदिर आहे. हे मंदिर फार वर्षांपूर्वीचे असून घाटाई देवी जागृत देवस्थान समजले जाते. त्यामुळे कास पठार पाहायला येणारे बहुतांश पर्यटक घाटाई मंदिराला भेट दिल्याशिवाय परत फिरत नाहीत. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजल्यानंतर काही पर्यटक घाटाई मंदिर परिसरात फिरत असताना त्यांच्या नजरेला रानगव्यांचा कळप पडला. अचानक हा कळप समोर आल्यामुळे अनेक पर्यटकांची चांगलीच भंबेरी उडाली तर काही पर्यटकांनी हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये कॅमेरा कैद केला. आता दिवाळीची सुट्टी लागली असून येत्या काही दिवसात कास पठार व परिसरात पर्यटकांची होणारी मोठी गर्दी पाहता, कास संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या कर्मचाऱ्यासह सातारा परिमंडल वन विभागातील कर्मचाऱ्यांनी सजग राहून पर्यटकांच्या सुरक्षितेकडे लक्ष देण्याची गरज या निमित्ताने निर्माण झाली आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
संगमनगर पोलीस दूरक्षेत्र असून अडचण नसून खोळंबा
पुढील बातमी
आयएनएस विक्रांत अद्वितीय : नरेंद्र मोदी

संबंधित बातम्या