सातारा : सततचा प्रवास, दीर्घ कालावधीचे उपोषण आणि दौर्यांचे व्यस्त शेड्यूल यामुळे शनिवारी सातार्यात गांधी मैदानावर शांतता रॅली च्या भाषणानंतर संघर्षयोद्धा जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक बिघडली. हात थरथरत असल्यामुळे आणि अचानक अशक्तपणा आल्याने मनोज जरांगे स्टेजवरच मटकन खाली बसले.
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील गेल्या चार दिवसापासून पश्चिम महाराष्ट्राच्या मराठा आरक्षण सद्भावना रॅलीमध्ये आहेत. दुपारी पावणेतीन च्या दरम्यान कोल्हापूरवरून त्यांचे सातार्यात आगमन झाले. दीड तासाच्या रॅली नंतर जरांगे पाटील यांचे पावणेचार वाजता गांधी मैदानावर आगमन झाले. गांधी मैदानावर मराठा मोर्चा समन्वयकांनी त्यांचे स्वागत केले. आपल्या 55 मिनिटांच्या तडाखेबंद भाषणांमध्ये जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला. भाषणामध्ये आपली प्रकृती ठीक नसून हात थरथरत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. भाषण संपल्यानंतर जरांगे पाटील अचानक अशक्तपणा आल्याने स्टेजवरच खाली बसले. तेव्हा क्रांती मोर्चा समन्वयक ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर व जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे हे तातडीने त्यांच्याकडे धावले. यानंतर जरांगे यांना पिण्यासाठी पाणी देण्यात आले. तेथून वाहनाने त्यांना तातडीने एका खाजगी हॉस्पिटलमध्ये आरामाकरिता रवाना करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली.
शरीरातील जलांश कमी होऊन अशक्तपणा आल्याने ही चक्कर आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आता जरांगे पाटील यांची प्रकृती स्थिर असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. शनिवारी मुक्काम केल्यानंतर जरांगे पाटील शांतता रॅलीसाठी पुण्याला रवाना होणार आहेत.
भाषणानंतर मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली
चक्कर आल्याने स्टेजवरच मारली बसकन
by Team Satara Today | published on : 10 August 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा