कराड : कोयना विभागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाजेगाव येथे वाहतुकीसाठी तयार केलेला पर्यायी मार्ग वाहून गेला आहे. या परिसरात आता मार्ग तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून 24 तासानंतरही कराड - चिपळूण मार्गावरील वाहतूक ठप्पच आहे.
कराड - चिपळूण मार्गावरील वाजेगावनजीक नवीन पूल उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या परिसरात पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता आणि यावरून वाहतूक सुरू होती. मात्र जोरदार पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढून पर्यायी मार्ग वाहून गेला आहे. या ठिकाणी चोवीस तास उलटून गेले तरी कोकणाला जोडणारा महत्वपूर्ण असा कराड-चिपळूण मार्ग अद्यापही वाहतुकीसाठी बंद आहे. दरम्यान, कराडकडून कोकणात जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे.
तर कोकणातून येणारी वाहतूक संगमनगर-मणेरी-नेरळे -मोरगिरी या पर्यायी मार्गावरून वळविण्यात आली आहे. अद्यापही या मार्गावरील अनेक ठिकाणची कामे सुरू असल्याने कदाचित बुधवारी ट्रायल घेतल्यानंतर कराड-चिपळूण मार्गावरील वाहतूक सुरू होण्याची शक्यता प्रशानसाकडून वर्तवण्यात आली आहे. वाजेगावजीक वाहून गेलेल्या पर्यायी रस्त्यानजीक नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूला भराव टाकून सध्या हा पूल वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आला आहे.
मंगळवारी पावसाने काही प्रमाणात उघडीप दिल्यानंतर संबंधित कंपनीने या मार्गावरील धोकादायक ठिकाणच्या डागडुजीची कामे युध्द पातळीवर हाती घेतली आहेत. जेसीबी आणि पोकलँडच्या साह्याने महामार्गावरील वाजेगाव, शिरळसह अन्य ठिकाणचे रस्ते, भराव तसेच ज्या ठिकाणी पावसामुळे धोका, अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणची धोकादायक वळणे, अडचणी काढून प्रशासनाकडून महामार्ग मजबुतीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. दरम्यान चिपळूणकडून कराडकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने धिम्या गतीने सुरू करण्यात आली आहे.
या महामार्गावर शिरळ गावच्या हद्दीत वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा डागडुजीसह मजबुतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र असे असले तरी वाहतूक बंद असल्याने महामार्गावर मालट्रक तसेच अन्य अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून राहिल्याचे कराड - चिपळूण मार्गावर पहावयास मिळत आहे.