‘अजिंक्यतारा’ कारखान्याचे कामकाज दिशादर्शक : ना. नितीन गडकरी; अजिंक्यतारा कारखान्यास 'उच्च साखर उतारा' राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

by Team Satara Today | published on : 24 September 2026


सातारा : सहकारी साखर कारखानदारीसमोर अनेक आव्हाने उभी असतात. अशा आव्हानांचा, अनेक अडचणींचा सामना करून सहकारी साखर कारखान्यांना मार्गक्रमण करावे लागते. साताऱ्यातील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने अनेक अडचणींवर मात करून प्रगतीचा आलेख चढता ठेवला आहे. शेतकऱ्यांसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या अजिंक्यतारा कारखान्याचे कामकाज सहकार क्षेत्रासाठी निश्चितच दिशादर्शक आहे, असे गौरवोद्‌गार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काढले.
नॅशनल फेडरेशन न्यू दिल्ली, या देशस्तरावरील केंद्रीय शिखर संस्थेकडून अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यास सिझन सन २०२५- २६ चा ‘हायस्ट शुगर रिकव्हरी इन हाय रिकव्हरी एरीया’ हा पुरस्कार मिळाला असून नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे झालेल्या शानदार पुरस्कार वितरण सोहळ्यात ना. गडकरी, केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यास 'उच्च साखर उतारा' या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार स्वीकारताना कारखान्याचेे व्हा. चेअरमन नामदेव सावंत, संचालक भास्कर घोरपडे, राजेंद्र घोरपडे, विजय घोरपडे, डॉ. शशिकांत साळुंखे, जयवंत कुंभार, बजरंग जाधव, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, वर्क्स मॅनेजर रणजित पोळ, प्रोडक्शन मॅनेजर सुरेश धायगुडे आदी उपस्थित होते.
स्व. भाऊसाहेब महाराज यांच्या दूरदृष्टीतून आणि सहकाराच्या भक्कम विचारधारेतून उभा राहिलेला अजिंक्यतारा कारखाना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कार्यरत असून शेतकरी, सभासद हित जोपासत कारखाना कायम प्रगतीपथावर राहील, असा विश्वास नामदेव सावंत यांनी याप्रसंगी व्यक्त केला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सोन्याच्या दागिन्यांचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी लोणी काळभोरच्या एकास अटक; लोणंद पोलिसांची कारवाई
पुढील बातमी
मी दिशा सालियन किंवा आदित्य ठाकरेंना कधीच भेटलो नाही; दिशा सालियन प्रकरणावर अभिनेता सूरज पांचोलीचा इन्स्टाग्रामवर मोठा खुलासा

संबंधित बातम्या