सातारा : पुणे-बंगलोर अशियाई महामार्गावर सातारा येथील अजंठा चौकामध्ये उड्डाणपुलाचा स्लॅब शुक्रवारी दुपारी अचानकपणे कोसळला. या घटनेची अफवा वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. याचवेळी काही सामाजिक, राजकीय संघटनांनी विविध घोषणाबाजी करत आंदोलनही केले. मात्र, प्रत्यक्षात नॅशनल हायवे ॲथोरीटीच्या व्यवस्थापकडून स्लॅबच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.
शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता अजंठा चौक येथील महामार्गावरील स्लॅबच्या कामासाठी मशीनने होल पाडले जात होते. त्यावेळी खाली पडलेली खडी कोणालाही इजा पोहोचू नये, यासाठी पोलिसांनी सुरक्षेच्या उपाययोजना राबवत पुलाखालून साताऱ्याकडे येणारा रस्ता काही वेळ बंद केला होता.
सातारा येथून रहिमतपूरकडे जाणारा रस्ता हा अजंठा चौकातून पुढे जातो. याच ठिकाणी महामार्गाचा उड्डाणपूल आहे. शुक्रवारी नेहमीप्रमाणे येथील वाहतूक सुरु होती. त्याचवेळी उड्डाणपुलाच्या स्लॅबचे काम हाती घेण्यात आले होते. त्यामुळे त्याचे काही तुकडे खाली कोसळले. यावेळी स्लॅबमधील तारा उघड्या पडल्या. यामुळे सुरक्षितता लक्षात घेवून पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक काही काळ इतरत्र वळवली होती.
देगाव, रहिमतपूरकडे जाणारी वाहतूक दुसऱ्या लेनवरुन सुरु ठेवण्यात आली होती. उड्डाणपुलाच्या रस्त्याला कराडकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर मोठाले डबरे पडले आहेत. या डबऱ्यामधून उड्डाणपुलाच्या खालचा रस्ता दिसत असून खालून वर पाहिले तर आकाश दिसत आहे. याचवेळी पोलिसांनी वाहतूक व्यवस्था चोख ठेवली होती.