सातारा : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेल्या डॉल्बीच्या दणदणाटाबद्दल बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. छत्रपती घराण्यात जन्माला येऊन संभाजी महाराजांचा तुम्ही अपमान करता ? असा रोकडा सवाल बिचुकले यांनी मंत्री शिवेंद्रराजे यांना केला असून, तुम्हाला याची जाणीव असेल तर मंत्रिपदाचा राजीनामा द्या असे त्यांनी सुनावले आहे.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनाच्या दिवशी तुमच्या टुकार कार्यकर्त्यांनी डॉल्बीचा दणदणाट केला. त्याला तुमचा होकार होता. नाच गाण्यांचे कार्यक्रम लागले. तुमचा वाढदिवस होता 30 मार्चला. त्या दिवशी तुम्ही काहीही केले असते तर मी काहीही बोललो नसतो. पण छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनादिवशी तुम्ही तुमचा वाढदिवस साजरा करत असाल, तर ही छत्रपती घराण्याला आणि शिवेंद्रराजे या नावाला लज्जास्पद गोष्ट आहे अशी तिखट प्रतिक्रिया बिचुकले यांनी व्यक्त केली.
छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनी जो डॉल्बीचा दणदणाट केला गेला याची तुम्हाला जाणीव असेल तर तुम्ही आत्ता मंत्री पदाचा राजीनामा द्या असे छत्रपतींचा वैचारिक वारस म्हणून आपल्याला सांगणे आहे असे ते शिवेंद्रराजे यांना उद्देशून म्हणाले.
शिवेंद्रराजे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरभर लावण्यात आलेल्या बॅनरबाजीवरही बिचुकले यांनी तीव्र आक्षेप घेतला. मंत्रीपद मिळाल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा केला गेला. तुमच्या या यशामध्ये अभिजीत बिचुकलेचा मोठा वाटा आहे. वेळ आल्यानंतर सगळ्या गोष्टी बाहेर येतील असेही त्यांनी ठणकावले.
संभाजी महाराजांच्या बलिदान दिनी डॉल्बीचा दणदणाट
बिचुकलेंकडून शिवेंद्रराजेंच्या राजीनाम्याची मागणी
by Team Satara Today | published on : 31 March 2025

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा