सातारा : आम्ही पुस्तक प्रेमी समूह आणि दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळच्या कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विनोद कुलकर्णी यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम येथील दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉलमध्ये सोमवार दि.१४ रोजी सायंकाळी ५।। वाजता आयोजित केला आहे.
हा सत्कार ज्येष्ठ लेखक, साहित्यिक व अष्टपैलू व्यक्तिमत्व विनय हर्डीकर तसेच प्रख्यात साहित्यिक आणि विचारवंत प्राचार्य डॉ. सुनील कुमार लवटे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. कार्यक्रमास डॉ. संदीप श्रोत्री, श्रीराम नानल, शिरीष चिटणीस व विनायक भोसले उपस्थित राहणार आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कोषाध्यक्षपदी विनोद कुलकर्णी यांची झालेली निवड त्यांच्या असंख्य स्नेही मंडळींना समाधान देणारी असून अभिमान वाटावा अशी आहे.साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या विनोद कुलकर्णी यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. आता साहित्य मंडळासाठी महत्वाची जबाबदारी सांभाळतील. या पदाला ते न्याय देतील. याबद्दल कोणाच्याच मनात शंका नाही.सार्वजनिक जीवनात स्वतःची ओळख निर्माण करणे आव्हानात्मक असते. ते आव्हान विनोद कुलकर्णी यांनी यशस्वीपणे पेलून दाखविले. आज मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त आहे. यासाठी ज्यांनी अतिशय परिश्रम घेतले होते.त्यात विनोद कुलकर्णी अग्रभागी आहेत. त्यांच्याच पुढाकारातून मराठीसाठी राजधानीत पंतप्रधान मोदी यांना एक लाख पत्रे पाठवली गेली होती. केवळ पत्र पाठवून ते थांबले नाहीत.ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासारख्या दिग्गज नेत्याबरोबर त्यांनी दिल्लीत धडक दिली. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. त्यामध्ये या धडपडीचाही समावेश आहे.महाराष्ट्राला हे फळ मिळाले. मराठीवर अभिजाततेचे शिक्कामोर्तब झाले.रचनात्मक कार्य प्रभावी होण्यासाठी खंबीर कृती, प्रभावी संवाद कौशल्य अशी विनोद कुलकर्णी यांची अनेक वैशिष्ट्ये आहेत. मराठी भाषा, मराठी साहित्य यांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी साताऱ्यात उभ्या राहिलेल्या मराठी भाषेच्या चळवळीची धुरा विनोद कुलकर्णी यांनी समर्थपणे सांभाळली आहे.९९,१०० आणि १०१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं नियोजन आणि नेतृत्व कारण्याची जबाबदारी आता महाराष्ट्र साहित्य परिषद ,पुणे यांचेकडे महामंडळ ३ वर्षेसाठी आल्यामुळे आली आहे. ऐतिहासिक ही तिन्ही संमेलने होऊन जगभरातील मराठी भाषिकांना वेगळी दिशा देऊन मराठी भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी याचा खचितच उपयोग होईल. एकच व्यक्ती वेगवेगळ्या क्षेत्रात सारखाच अधिकार मिळविते, हा खरेतर चमत्कार आहे. तो आपण सर्व त्यांच्या रूपाने पाहत आहोत. पत्रकारितेत त्यांनी समाजाभिमुख पत्रकारितेचा मानदंड निर्माण केला. बँकिंग क्षेत्रातील त्यांचे कार्य मोठे आहे आणि तेच स्थान त्यांनी ध्येय निष्ठतेच्या बळावर साहित्य क्षेत्रातही मिळविले. महामंडळाचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार आणि कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी या सर्वांना बरोबर घेऊन वेगळी वाट चोखाळतील, हे निश्चित आहे.