सातारा : सातारा जिल्ह्यातील जनसामान्यांचे आधारवड व राजकारण, शिक्षण व सहकारातील पितामह माजी खासदार व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष स्व. लक्ष्मणराव पाटील यांची जयंती बँकेचे मुख्य कार्यालय, सातारा येथे संपन्न झाली.
यावेळी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक राजेंद्र राजपुरे, प्रदीप विधाते, सुनील खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे, प्रवीण भिलारे विविध विभागांचे उपव्यवस्थापक व मान्यवर यांनीही स्व. लक्ष्मणराव पाटील यांचे प्रतिमेस फुले वाहून विनम्र अभिवादन केले.
यावेळी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई म्हणाले, सातारा जिल्हा बँकेच्या एकूणच वाटचालीत लक्ष्मणराव तात्या यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी बँकेच्या प्रशासकीय शिस्तीला प्राधान्य दिले. लक्ष्मणराव पाटील निर्भय व निस्वार्थी वृत्तीचे होते. राजकीय वारसा नसलेले सातारा जिल्ह्यातील हे नेतृत्व ग्रामपंचायतीच्या राजकारणापासून यशाची शिखरे गाठत दोनदा खासदार झाले. गरजूंना शक्य ती मदत मनापासून करण्याच्या वृत्तीमुळे लोकांच्या गळ्यातील ताईत बनले. सर्वसामान्यांचा आधारवड अशी त्यांची ख्याती होती.
या प्रसंगी राजेंद्र राजपुरे म्हणाले, तात्यांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील योगदान नव्या पिढीला अतिशय मार्गदर्शक असे आहे. बोपेगावचे सरपंच, ते लोकसभा सदस्य, किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संचालक आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अशी स्व. लक्ष्मणराव पाटील यांची यशस्वी कारकीर्द आहे. तात्यांचे व्यक्तिश: मला आशीर्वाद लाभले असून ते मला कुटुंबातीलच एक घटक मानत असलेचे यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले.
याप्रसंगी डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, बँकेला सुरुवातीपासूनच यशवंतराव चव्हाण, आर.डी. पाटील, आबासाहेब वीर, बाळासाहेब देसाई इत्यादी नेत्यांचे चांगले नेतृत्व लाभलेमुळे बँकेची चांगली प्रगती झाली आहे. लक्ष्मणराव पाटील यांनी सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळून त्यांनी आपल्या प्रशासकीय कामकाजात वेगळा ठसा उमटविला. बँकेच्या प्रगतीमध्ये त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभल्याने बँकेत आर्थिक शिस्त, राजकारणविरहीत कामकाज झाले आहे.