फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. रुपनवर यांच्या आत्महत्येमुळे आरोग्य विभागातील कारभार चव्हाट्यावर; दहा महिन्यांत दुस-या डॉक्टरांचा बळी

by Team Satara Today | published on : 01 September 2026


फलटण : डॉ. रुपनवर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात मांडल्या होत्या. संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, असा आग्रह धरला होता. मात्र, प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, असा उल्लेख त्यांनी व्हायरल व्हिडिओत केला होता. त्यांच्या आत्महत्येमुळे आरोग्य विभागातील कारभार चव्हाट्यावर आल्याची फलटण परिसरात चर्चा आहे.

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानंतर या रुग्णालयात कमालीची अस्वस्थता होती. राजकीय हस्तक्षेप आणि वरिष्ठांकडून मानसिक छळ होत असल्याच्या तक्रारी कर्मचा-यांकडून होत्या. यातच वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रुपनवर यांनाही राजकीय दबावाचा सामना करावा लागला. माजी मंत्र्यांच्या कथित पीएने रुग्णालयातच त्यांची गळपट पकडून धमकावले. डॉ. रुपनवर यांच्या इशा-यानंतरही आरोग्य विभागाने याकडे गांभीर्याने पाहिले नाही. अखेर दहा महिन्यांत दुस-या डॉक्टरांचा बळी गेल्यामुळे मुर्दाड यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने २३ ऑक्टोबर २०२५ रोजी आत्महत्या केल्याने महाराष्ट्र हादरला होता. फिटनेस प्रमाणपत्रासाठी दबाव आणि पोलिस यंत्रणेच्या अनास्थेचा त्या बळी ठरल्याचे समोर आले होते. महिला डॉक्टरना न्याय मिळावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरला होता. ते प्रकरण ताजे असतानाच फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ राजेंद्र रुपनवर राजकीय दबावाचे बळी ठरले.

माजी मंत्र्यांच्या पीएने शस्त्र परवान्यासाठी फिटनेस प्रमाणपत्र मिळावे, असा दबाव डॉ. रुपनवर यांच्यावर टाकला होता. त्याप्रकरणी वरिष्ठांनी सहकार्य केले नाही. वरिष्ठांची चौकशी झाली नाही. चौकशी समितीने फार्स केला. रुग्णालयात जेवणावळी झाल्या, असा आरोप करीत डॉ. रुपनवर यांनी निराशा व्यक्त केली होती. याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

राजीनामा दिल्यानंतर डॉ. रुपनवर यांना मुख्यालयात हजर राहण्याचा आदेश वरिष्ठांनी दिला होता. दरम्यान, चौकशी समितीने फलटण उपजिल्हा रुग्णालयात जाऊन वैद्यकीय अधीक्षक लीला मदने यांची चौकशी केली. डॉ. रुपनवर यांचा जबाब नोंदवला. मात्र, चौकशीचा अहवाल वेळेत दिला नाही. वरिष्ठांवर कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर आरोग्य विभागातील एकाही अधिकाऱ्यांनी रुग्णालयात येऊन विचारपूस, चौकशी केली नाही, असाही आरोप डॉ. रुपनवर यांच्या नातेवाईकांनी केला आहे. रुपनवर यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर काही वेळात डॉ. मदने यांनी फलटण पोलिस ठाण्यात रुपनवर यांच्या विरोधात बदनामीची तक्रार दिली होती.

हे प्रश्न अनुत्तरीत

    डॉ. रुपनवर यांच्याकडून तक्रारींनंतर वरिष्ठांनी काय कार्यवाही केली?
    त्यांनी दिलेल्या आत्महत्येच्या इशाऱ्यांकडे गांभीर्याने का पाहिले नाही?
    वैद्यकीय अधीक्षकांच्या चौकशी अहवालाचे काय झाले?
    त्यांच्यावर तातडीने कारवाई का झाली नाही?
    डॉ. मदने यांच्या निलंबनाची ऑर्डर कधी काढली?


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पुण्याच्या गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये लेझर लाईट्सचा वापर केल्यास कारवाई; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
पुढील बातमी
सुटे तेल विकायला १ वर्षाची मुदतवाढ; तुकाराम मुंढेंच्या निर्णयाला मुख्यमंत्री फडणवीसांची स्थगिती, व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठकीनंतर निर्णय

संबंधित बातम्या