विवाहितेवर जबरदस्तीने अत्याचार; मेढा पोलिसांकडून मानेवाडीच्या संशयितास अटक

by Team Satara Today | published on : 05 June 2026


​मेढा : घरगुती भांडणे मिटवण्याचे आणि पतीला धडा शिकवण्याचे आमिष दाखवून एका विवाहितेवर जबरदस्तीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मेढा येथे घडली आहे. याप्रकरणी मेढा पोलिसांनी गुन्हा दाखल करत संशयित आरोपीला अटक केली आहे. रवी जगन घाडगे (रा. मानेवाडी, पोस्ट गजवडी, ता. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

​याबाबत मेढा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावली तालुक्यातील गांधीनगर येथील एका विवाहितेचे तिच्या सासूसोबत भांडण झाले होते. या भांडणाचा गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने ओळखीचा असलेला संशयित रवी घाडगे हा गुरुवारी, ४ जून रोजी सकाळी आठच्या सुमारास विवाहितेच्या वडिलांच्या घरी गेला. त्यावेळी विवाहिता घरात एकटीच होती. संशयिताने विवाहितेला 'मी तुझी सासूसोबत झालेली भांडणे मिटवतो आणि तुझ्या नवऱ्याला चांगला धडा शिकवतो, पण तुला माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवावे लागतील' असे म्हटले.

​त्यानंतर संशयिताने विवाहितेला जबरदस्तीने घरातील बेडरूममध्ये नेले. बेडरूमच्या दरवाजाची कडी लावून, 'जास्त आरडाओरडा करू नकोस, नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही' अशी धमकी देऊन तिचे तोंड दाबले. विवाहितेच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने अत्याचार केला. या धक्कादायक प्रसंगामुळे मनस्ताप सहन न झाल्याने पीडित विवाहितेने घरात असलेले फरशी पुसण्याचे फिनाईल प्राशन केले.

​या घटनेनंतर पीडितेने मेढा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. विवाहितेच्या तक्रारीवरून मेढा पोलिसांनी संशयित आरोपी रवी जगन घाडगे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(१), ३३३, आणि ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंगटे करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडीत एकजूट; राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अभयसिंह जगताप यांचा विजयाचा दावा
पुढील बातमी
किराणा सामान आणण्यासाठी बाहेर पडलेली महिला अद्याप बेपत्ता; पोलिसांकडून महिलेचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू

संबंधित बातम्या