नवी दिल्ली : हरियाणातील जींद रेल्वेस्थानकावरून देशातील पहिल्या हायड्रोजन इंधन सेलवर (फ्यूल सेल) चालणाऱ्या प्रवासी ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (दि. १६) हिरवा झेंडा दाखवला. ही ट्रेन उत्तर रेल्वेच्या जींद-सोनिपत रेल्वे मार्गावर धावली. यामुळे देशात स्वच्छ ऊर्जेवर आधारित रेल्वे वाहतुकीची सुरुवात झाली आहे.
ही ट्रेन पारंपरिक इलेक्ट्रिक ट्रेनप्रमाणे ओव्हरहेड वीजवाहिनीवर अवलंबून नाही. यामध्ये बसवण्यात आलेल्या 'प्रोटॉन एक्स्चेंज मेम्ब्रेन फ्यूल सेल' मध्ये हायड्रोजन आणि वातावरणातील ऑक्सिजन यांच्यातील रासायनिक प्रक्रियेतून वीजनिर्मिती होते. त्यावर ही ट्रेन चालते. या प्रक्रियेत केवळ पाण्याची वाफ (जलवाष्प) आणि उष्णता बाहेर पडते; त्यामुळे कार्बनचे उत्सर्जन किंवा धूर अजिबात होत नाही.
रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, ट्रेनमध्ये हायड्रोजन गळती, अतिउष्णता, आग आणि धूर यांचा त्वरित शोध घेणारी रेल्वेची बहुस्तरीय (मल्टी-लेयर) सुरक्षा प्रणाली बसवण्यात आली आहे. अशी परिस्थिती उद्भवल्यास हायड्रोजनचा पुरवठा आपोआप बंद होतो. ट्रेनमध्ये सतत व्हेंटिलेशनची (हवा खेळती राहण्याची) व्यवस्था आहे, जेणेकरून किरकोळ गळती झाल्यास हायड्रोजन वातावरणात मिसळून सुरक्षितपणे नाहीसा होईल. लोको पायलटच्या सुरक्षेसाठी विशेष केबिन तयार करण्यात आले आहे. यात संपूर्ण सिस्टीमवर रिअल टाईम लक्ष ठेवणारी डिजिटल स्क्रीन आणि आपत्कालीन परिस्थितीत ट्रेन सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, जींद-सोनिपत प्रकल्पातून मिळालेल्या अनुभवाच्या आधारे भविष्यात कालका शिमलासारख्या हेरिटेज रेल्वे मार्गावरही हायड्रोजन तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या शक्यतांचा अभ्यास केला जाईल. भारतीय रेल्वेनुसार, ब्रॉडगेज नेटवर्कचे ९९ टक्क्यांपेक्षा जास्त विद्युतीकरण झाले आहे. स्वच्छ आणि शाश्वत रेल्वे वाहतुकीच्या दिशेने हायड्रोजन ट्रेन हे पुढचे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
जींदमध्ये देशातील सर्वात मोठा रेल्वे हायड्रोजन रिफ्यूलिंग प्लांट
जींद येथे देशातील सर्वात मोठा रेल्वे हायड्रोजन रिफ्यूलिंग प्लांटही उभारण्यात आला आहे. तिथे हायड्रोजनची साठवणूक, संपीडन (कॉम्प्रेशन) आणि इंधन भरण्याची आधुनिक यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. यातून भारताची पहिली एकात्मिक हायड्रोजन रेल्वे परिसंस्था (हायड्रोजन रेल्वे इको-सिस्टीम) तयार झाली आहे.