सातारा : स्वारगेट वरून पुणे-बेंगलोर महामार्गावरून सांगलीकडे निघालेल्या शिवशाही बसला वाढेफाटा परिसरात टायर फुटून अचानक आग लागली. यामुळे महामार्गावर एकच गोंधळ उडाला. दुपारी एकच्या दरम्यान ही घटना घडल्याचे वृत्त आहे. सातारा पालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
पुणे-बेंगलोर महामार्गावर नेहमीप्रमाणे वर्दळ सुरु होती. सांगली आगाराची शिवशाही बस स्वारगेट वरून सकाळी साडेनऊच्या सुमारास निघाली. गाडी वाढे फाटा परिसरात आली असता गाडीचा मागील टायर अचानक फुटून मोठा आवाज झाला. गाडी पंक्चर झाल्यामुळे सर्व प्रवासी तातडीने बस बाहेर उतरत असताना अचानक डाव्या बाजूने गाडीने पेट घेतला आणि म्हणता म्हणता आगीने रौद्ररूप धारण केले. खबरदारीचा उपाय म्हणून महामार्ग पोलीस तसेच सातारा तालुका पोलीस यांनी घटनास्थळी येऊन दोन्ही बाजूची वाहतूक थांबवली.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. बसचा संपूर्ण पत्रा जळून काळा ठिक्कर पडला होता. सातारा पालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी येऊन आग आटोक्यामध्ये आणली. महामार्ग परिसरात बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. लांबून आगीचे लोट दिसून येत होते. आग विझल्यानंतर टोइंग व्हॅन ने ही बस सातारा आगारात आणण्यात आली आहे.
वाढे फाटा परिसरात शिवशाही बसला अचानक आग
टायर फुटल्यानंतर झाली दुर्घटना, अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात
by Team Satara Today | published on : 10 September 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा