सातारा : बँक घोटाळ्यात सहभाग असल्याचे सांगून डिजिटल अरेस्टची भीती दाखविणार्या सायबर भामट्यांनी 71 वर्षीय वृद्धाची 28 लाख रुपयांची फसवणूक केली. तब्बल 1,700 कोटी रुपयांच्या घोटाळ्याशी संबंध जोडून वृद्धाला विविध खात्यांवर पैसे पाठविण्यास भाग पाडण्यात आले. 15 सप्टेंबर ते 27 ऑक्टोबरदरम्यान हा प्रकार घडला.
विठ्ठल दिनकर फडतरे (रा. जिहे, ता. सातारा) यांनी सायबर क्राइम पोर्टलवर तक्रार नोंदविली आहे. आरोपींनी व्हॉट्सप कॉल आणि व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला. आपण मुंबईतील अँटी करप्शन ब्युरोचे वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून संदीप कुमार याच्या कथित 1,700 कोटींच्या बँक घोटाळ्यात 170 जण सहभागी असल्याचे सांगितले. त्यातील 40 कोटी रुपये फडतरे यांना मिळाल्याचा बनाव केला. रिझर्व्ह बँकेमार्फत पैशांची पडताळणी करण्याचे कारण देत विविध खात्यांवर रक्कम जमा करण्यास सांगितले. अशा प्रकारे 28 लाख रुपये उकळले. अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक निलेश तांबे तपास करीत आहेत.
1,700 कोटींच्या घोटाळ्यात सहभाग असल्याचे सांगून सायबर भामट्यांचा जिहे येथील वृद्धाला 28 लाखांचा गंडा
by Team Satara Today | published on : 31 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा