वाई : मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे ‘जललक्ष्मी’ प्रवाही सिंचन योजनेंतर्गत वाई तालुक्यातील महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला आहे. धोम-बलकवडी प्रकल्पाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यांद्वारे तालुक्यातील 23 गावांमधील शेतकरी सिंचनाच्या सुविधेचा लाभ घेत आहेत.
या योजनेच्या पाणी आवर्तनासाठी कार्यकारी अभियंता संजय बोडखे, उपविभागीय अधिकारी श्रीकांत महामुनी, सहाय्यक अभियंता अभिजित पोकळे, तेजस शितोळे, स्थापत्य अभियंता सहाय्यक शुभम उगले, सचिन सनस, अविनाश घाणे, पाटकरी गणेश गायकवाड व ज्ञानदेव जाधव यांचा मोलाचा वाटा आहे.
या योजनेद्वारे धोम धरणाच्या वरील बाजूस कृष्णा नदीच्या पाण्याचे नियोजन केले जात आहे. 44.70 कोटी रुपयांच्या या प्रकल्पात बंदिस्त पाइपलाइनचा वापर केल्याने दुर्गम भागातील गावांना पाणी मिळणे सुलभ झाले आहे. वितरण व्यवस्थेची कामे प्रलंबित असली, तरी मुख्य नलिकेतून पाणी पोहोचल्याने शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या योजनेच्या उजव्या मुख्य नलिकेचे एकूण 31 किमीपैकी 26.260 किमीपर्यंतचे काम झाल्याने, पाणी आता शेवटच्या टोकापर्यंत (टेल एंड) पोहोचले आहे. त्यामुळे गोळेवाडी, वायगाव, दह्याट, बोरगाव बुद्रुक व खुर्द, धावली, मालतपूर, चिखली, मुगाव, दसवडी, न्हाळेवाडी, बोरीव, व्याहळी, कुसगाव, पसरणी, सोनगीरवाडी, सिद्धनाथवाडी या गावांमधील 500 हेक्टर शेतीला लाभ मिळत आहे. डाव्या मुख्य गुरुत्वीय नलिकेचे 12.735 किमीचे काम पूर्ण झाले असून, बलकवडी, नांदगणे, परतवडी, कोंडवली बुद्रुक आणि खुर्द या गावांमधील 160 हेक्टर शेतीला पाणी दिले जात आहे. तांत्रिक अडचणींवर मात करत प्रशासनाने या भागातील सिंचन व्यवस्था कार्यान्वित केली आहे.