साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात जमीन घालण्याचा डाव

नाशिकमधील वृक्षतोडीवरून राज ठाकरेंचा सरकारवर ‘मनसे’ स्टाईल हल्लाबोल

by Team Satara Today | published on : 29 November 2025


मुंबई : आगामी कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी नाशिकमध्ये १८०० झाडे तोडण्याच्या सरकारच्या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. "साधूंच्या नावाखाली जमिनी सपाट करायच्या आणि नंतर त्या लाडक्या उद्योगपतींच्या घशात घालायच्या, हाच सरकारचा विचार आहे," अशा शब्दात राज ठाकरे यांनी सरकारवर सडेतोड टीका केली आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे मनसेच्या सत्ताकाळातील कुंभमेळ्याची आठवण करून दिली आहे. ते म्हणाले की, "नाशिकमध्ये कुंभमेळा पहिल्यांदा होत नाहीये. मनसेच्या सत्ताकाळातही कुंभमेळा झाला, त्यावेळी आम्ही भरपूर पायाभूत सुविधा उभारल्या. विशेष म्हणजे, त्यावेळच्या नियोजनाचे कौतुक थेट अमेरिकेत झाले होते. तत्कालीन महापौर आणि आयुक्तांचा अमेरिकेत सत्कार झाला होता. हे सर्व करताना आम्हाला एकही झाड तोडावे लागले नाही, मग आताच झाडे तोडण्याची गरज का भासतेय?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

सध्या महाराष्ट्रात जमिनी गिळणे आणि उद्योगपतींचे दलाल म्हणून काम करणे हेच सुरू असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला आहे. "कुंभमेळ्याचे कारण दाखवून झाडे तोडायची आणि नंतर ती मोकळी झालेली जमीन उद्योगपतींना दान करायची," हाच यामागे सरकारचा डाव असल्याचा दावा त्यांनी केला.

नाशिककरांच्या या वृक्षतोडीला असलेल्या विरोधाला मनसेचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केले. "लोकांच्या म्हणण्याचा आदर करा, उगाच संघर्ष वाढवू नका. तरीही सरकारने हट्टाची भूमिका घेतली, तर जनतेच्या बरोबर या लढ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरेल," असा कडक इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

​‘...तर साधुग्राम तिकडेच करा’

झाडे तोडून दुसरीकडे पाचपट झाडे लावण्याच्या सरकारच्या आश्वासनाची खिल्ली उडवताना राज ठाकरे म्हणाले की, ही फक्त पोकळ आश्वासने आहेत. "जर सरकारकडे दुसरीकडे पाचपट झाडे लावायला जागा आहे, तर मग तिकडेच साधुग्राम का करत नाही?" असा बिनतोड सवाल त्यांनी विचारला आहे. भाजप सरकारने यापूर्वी केलेल्या कोटींच्या वृक्षलागवडीच्या घोषणेचाही त्यांनी समाचार घेतला.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
हृदयद्रावक: "माझ्या आई-बापाला फाशी द्या !
पुढील बातमी
गुलाबी थंडीची चाहूल लागताच सातारच्या मंडईत 'जंबुश्वरी'ची एन्ट्री; आवळ्याचे दर गडगडले

संबंधित बातम्या