सातारा : शेतातील वीज ट्रान्सफॉर्मर फोडून तांब्याची तार चोरणाऱ्या टोळीचा सातारा तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला असून एका संशयिताकडून तब्बल १४ गुन्ह्यांतील ५ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतांमधील ट्रान्सफॉर्मर लक्ष्य करून तांब्याच्या तारा लंपास करण्याचे प्रकार वाढले होते. त्यामुळे शेतकरी आणि महावितरणचे मोठे आर्थिक नुकसान होत होते. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी विशेष तपास मोहीम हाती घेतली होती.
दरम्यान, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार पंकज ढाणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे डीबी पथकाने एका संशयिताला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध ठिकाणच्या ट्रान्सफॉर्मरमधील कॉपर वायर चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी सखोल चौकशी करून ट्रान्सफॉर्मर चोरीचे तब्बल १४ गुन्हे उघडकीस आणले असून ५ लाख ८८ हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तारांचा साठा हस्तगत केला आहे. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा अधिक तपास पोलीस अंमलदार रामचंद्र गोरे करीत आहेत.
ही धडक कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन काटकर, सहायक पोलीस निरीक्षक चंद्रहार पाटील, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत गुरव यांच्या नेतृत्वाखाली अंमलदार पंकज ढाणे, मनोज गायकवाड, राजू शिखरे, दादा स्वामी, संदीप पांडव, रामचंद्र गोरे, मालोजी चव्हाण, प्रवीण वायदंडे, मोना बोराटे, संदीप आवळे, सतीश बाबर, सुनील भोसले आणि संदीप फणसे यांच्या पथकाने केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पथकाचे कौतुक केले आहे.
ट्रान्सफॉर्मर चोरांच्या मुसक्या आवळल्या; सातारा तालुका पोलिसांची मोठी कारवाई
१४ गुन्ह्यांची उकल; ५ लाख ८८ हजारांची कॉपर वायर हस्तगत
by Team Satara Today | published on : 05 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा