सातारा : आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या सातारा जिल्हा कोअर कमिटीने शुक्रवारी येथील शासकीय विश्रामगृहात तातडीची बैठक घेतली. या बैठकीमध्ये महायुतीचा फॉर्म्युला आणि गरज पडल्यास मैत्रीपूर्ण लढती अशा दोन्ही पर्यायांवर समन्वयक चर्चा झाली. कोअ र कमिटीच्या माध्यमातूनच दहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकीय समीकरणांचा आढावा पुढील टप्प्यांमध्ये घेतला जाणार आहे.
भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ही तातडीची मीटिंग घेण्यात आली. या मिटींगला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, राज्याचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे तसेच जिल्हा कार्यकारिणीची पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टीने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याच्या दृष्टीने रणनीती सुरू केली आहे. या रणनीतीचा भाग म्हणून शुक्रवारी सुमारे दोन तास शासकीय विश्रामगृहाच्या दारणांमध्ये खलबते झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे सुतोवाच खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. तर उमेदवार निवडला जाताना तो निवडून येण्याच्या क्षमतेचा असावा तसेच त्याला राजकीय समन्वयक ज्ञान आणि सर्वसामान्य लोकांचे प्रश्न हाताळण्याचे हातोटी अशा विविध गुणांची गरज आहे, अशी मांडणी जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांनी केली.
ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सुद्धा या समन्वयक चर्चेमध्ये भाग घेतला आणि आपले विचार मांडत मैत्रीपूर्ण लढती आणि महायुती अशा दोन्ही गोष्टींवर जोर दिला.सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांची राजकीय बलाबल लक्षात घेता आणि जास्तीत जास्त चेहऱ्यांना संधी देणे त्यासाठी राजकीय समीकरणे तपासणी या दृष्टीने रचना करावी लागणार आहे अशी मांडणी बैठकीमध्ये करण्यात आली. त्यानुसार आगामी बैठकीमध्ये बूथ प्रमुख मंडल प्रमुख केंद्रप्रमुख यांच्याकडून मतदार याद्या मागवून घेऊन त्या दृष्टीने समन्वयक चर्चा केली जाणार असल्याची अतुल भोसले यांनी सांगितले.