मांढरगडावर रुग्णवाहिका न मिळल्याने अस्वस्थ झालेल्या भाविक महिलेचा दुर्देवी मृत्यू; ट्रस्टकडून मदतीस टाळाटाळ केल्याचा नातेवाईकांचा आरोप

by Team Satara Today | published on : 27 October 2026


मांढरदेव : एक आजारी असलेली महिला मांढरदेव येथील काळूबाईला आजारातून लवकर बरे कर अशी प्रार्थना करण्यासाठी कुटुंबीयांसमवेत आली होती. मात्र, तिला अचानक अस्वस्थ वाटू लागले. यावेळी तिच्या पतीने देवस्थान ट्रस्टकडे तिला दवाखान्यात नेण्यासाठी मदत करा अशी विनंती केली. मात्र, ते आमचे कामच नाही, अशी उत्तरे ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांनी दिली. वास्तविक तातडीने रुग्णवाहिका वा वाहन उपलब्ध झाले असते तर महिलेला उपचार मिळून तिचा जीव वाचू शकला असता मात्र, देवस्थान ट्रस्टने मदत करण्यास टाळटाळ केल्याने मांढरगडावरच तिचा मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी, मांढरदेव येथे काळुबाई देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना केंद्रबिंदू मानून त्यांना सुविधा पुरविणे हे देवस्थान ट्रस्टचे प्रमुख काम असून त्याकडे लक्ष न देता देवस्थानचा जबाबदार कर्मचारी उडवा उडवीची उत्तरे देऊन जर कोणा भाविकाला मृत्युमुखी पडावे लागत असेल तर देवस्थान ट्रस्टच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेव येथील श्री काळुबाई देवीच्या दर्शनासाठी नांदेड गाव येथून एक महिला दोन लहान मुलांना घेऊन तिच्या पती सोबत दर्शनासाठी आली होती. मांढरदेव येथील महाद्वार या ठिकाणी आल्यानंतर तिची प्रकृती अस्वस्थ जाणवू लागली म्हणून त्या महिलेच्या पतीने तेथील काही लोकांच्या मदतीने देवस्थान ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांची संपर्क साधला व दवाखान्यात नेण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. परंतु आपले ते कामच नाही अशी बेजबाबदार उत्तरे देऊन त्यांनी टाळाटाळ केली.असल्याचा आरोप उपस्थित लोकांकडून केला जात आहे. वेळेत अत्यावश्यक वैद्यकीय मदत मिळाली असती तर परिस्थिती वेगळी राहिली असती का? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.  
अशी आहे घटना .......
जनाबाई रामचंद्र पतंगवाढ (वय 40, रा. नांदेडगाव) या आपल्या कुटुंबीयांसह मांढरदेव येथे दर्शनासाठी आल्या होत्या. त्यांच्यासोबत दोन लहान मुले असल्याची माहिती आहे. संबंधित महिला आजारी असल्याचे सांगितले जात असून, काळुबाई देवीच्या दर्शनाने आपण बरे होऊ, या श्रद्धेने त्या मांढरदेव येथे आल्या होत्या, अशी माहिती समोर येत आहे. मात्र, प्रकृती बिघडल्यानंतर मदतीसाठी संबंधितांना संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. देवस्थानचे सचिव दादा कळंबे यांच्याकडे मदतीची याचना करूनही उडवाउडवीची उत्तरे देत प्रत्यक्ष मदतीसाठी येण्यास टाळाटाळ करण्यात आली, असा गंभीर आरोप आता करण्यात येत आहे.
या आरोपांची अधिकृत चौकशी होणे अत्यावश्यक आहे. देवस्थान प्रशासन नेमके करत तरी काय मांढरदेवसारख्या राज्यभर प्रसिद्ध आणि मोठ्या संख्येने भाविक येणाऱ्या धार्मिक स्थळी आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्था, तत्काळ रुग्णवाहिका आणि प्रशिक्षित मदत पथक उपलब्ध असणे ही मूलभूत गरज आहे. मात्र, या घटनेत अशा अत्यावश्यक सुविधांचा अभाव प्रकर्षाने समोर आला आहे. एका महिलेची प्रकृती गंभीर होत असताना तिला वेळेत वैद्यकीय मदत मिळाली का? संबंधितांनी मदतीसाठी केलेल्या फोनची दखल कोणी घेतली? देवस्थान प्रशासनातील जबाबदार अधिकारी त्या वेळी कुठे होते? रुग्णवाहिका किंवा वैद्यकीय पथक वेळेत का पोहोचले नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता देवस्थान प्रशासनाला द्यावी लागणार आहेत.
एका आईचा जीव गेला; जबाबदार कोण
मंदिराच्या पायथ्याशी एका आईचा मृत्यू होणे ही केवळ दुर्दैवी घटना म्हणून दुर्लक्षित करण्यासारखी बाब नाही. भाविकांच्या जीविताची जबाबदारी कोणाची? हा थेट सवाल या घटनेनंतर उपस्थित झाला आहे.महिलेचा मृत्यू नेमक्या कोणत्या वैद्यकीय कारणामुळे झाला, तिला किती वेळ उपचार मिळाले नाहीत, मदतीसाठी कोणाला संपर्क करण्यात आला, संबंधितांनी काय प्रतिसाद दिला आणि वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात विलंब झाला का, याची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे. श्रद्धेच्या ठिकाणी अंधश्रद्धेला खतपाणी तर नाही ना आजारी व्यक्तीने केवळ देवदर्शनाने आजार बरा होईल, या श्रद्धेने धार्मिक स्थळी येणे हा भावनिक आणि संवेदनशील विषय आहे. मात्र, श्रद्धा ही वैद्यकीय उपचारांना पर्याय होऊ शकत नाही. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या आरोग्याबाबत जनजागृती आणि अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची गरजही अधोरेखित झाली आहे.
घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी
मांढरदेव ट्रस्टच्या कारभाराची चौकशी करा या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, सचिव, प्रशासनातील संबंधित अधिकारी आणि घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या जबाबदार व्यक्तींची भूमिका तपासण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.मांढरदेव हे केवळ धार्मिक स्थळ नसून महाराष्ट्राच्या श्रद्धेचे मोठे केंद्र आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सुरक्षितता, आरोग्यसेवा आणि आपत्कालीन मदत मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. एका मातेचा जीव गेल्यानंतरही जर प्रशासन जागे झाले नाही, तर पुढचा बळी कोणाचा. हा प्रश्न आता केवळ जनाबाई पतंगवाढ यांच्या कुटुंबाचा नसून, मांढरदेवला येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या सुरक्षिततेचा आहे. या घटनेची वस्तुनिष्ठ चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि मांढरदेव येथे कायमस्वरूपी अत्यावश्यक वैद्यकीय सेवा व रुग्णवाहिका व्यवस्था तातडीने सुरू करावी, अशी मागणी भाविक व नागरिकांतून होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
एका कॉलवर बालकाला मिळाला आधार ! चाईल्ड हेल्पलाइन १०९८ च्या तत्परतेमुळे रेल्वे स्थानकावर आढळलेल्या बालकाला मदतीचा हात

संबंधित बातम्या