मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध गणपती लालबागच्या राजाची पहिली झलक सर्वांना पाहायला मिळाली. नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजा मंडळाचे हे 91 वे वर्ष आहे. लालबाग राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी सर्व क्षेत्रातील दिग्गज उपस्थिती लावतात. नुकतंच 'सैराट' अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे.
रिंकू ही बाप्पाच्या चरणी नतमस्तक झालेली दिसून आली. बाप्पाच्या दर्शनाचा फोटो तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. यावेळी रिंकू ही पारंपरिक लूकमध्ये लालबागचा राजाच्या दरबारात पोहचली. तिने आकाशी रंगाची साडी नेसली होती. तर त्यावर फुल स्लिव्हज ब्लाउज परिधान केलं होतं. यामध्ये रिंकू ही अतिशय साधी आणि सुंदर दिसत होती.
यंदा लालबागच्या राजाची मनमोहक अशी 14 फुटांची बाप्पाची मूर्ती यंदाच्या वर्षी मयूरासनावर विराजमान आहे. लालबागच्या राजाला यंदा मयूर महल केला असून मंडळाचे हे 91 वे वर्ष आहे. लालबागच्या राजाच्या मूर्तीचा भव्य देखावा भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी होत असते. संपूर्ण गणेशोत्सवाच्या काळात दर्शनासाठी मोठी रांग लागलेली असते.