सातारा : शाहूपुरी पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये चोरी गेलेले तब्बल 42 मोबाईल न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्यांच्या मूळ मालकांना परत केले आहेत. या मोबाईलची किंमत तब्बल 10 लाख 50 हजार रुपये इतकी होती. या कारवाईचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी कौतुक केले आहे.
सातारा शहर परिसरामध्ये मोबाईल चोरीचे प्रमाण प्रचंड वाढले होते. त्यानुसार शाहूपुरी पोलिसांना तात्काळ तपासाच्या सूचना देण्यात आल्या होत्या. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कुमार ढेरे यांनी तांत्रिक माहिती व महाराष्ट्रातील व इतर राज्यातील मोबाईल मिळालेल्या लोकांशी नियमित संपर्क करून शोध मोहीम राबवली. ही शोध मोहीम पंधरा दिवस राबवण्यात आली. शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ झालेले तब्बल 42 मोबाईल रिकव्हर करण्यात पोलिसांना यश आले. या मोबाईलची किंमत 10 लाख 50 हजार रुपये इतकी आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली ही शोध मोहीम राबवण्यात आली. हे सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत. या कारवाईमध्ये पोलिस अंमलदार सुरेश घोड, निलेश काटकर, ज्योतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे, संग्राम फडतरे, सायबर पोलीस ठाण्याचे महेश पवार, प्रशांत मोरे यांनी सहभाग घेतला.