पालखी सोहळ्याच्या आगमनानिमित्त वाहतुकीमध्ये बदल

पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचे निर्देश

by Team Satara Today | published on : 19 June 2025


सातारा : संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दिनांक 26 रोजी सातारा जिल्ह्यामध्ये लोणंद नगरीत आगमन होत आहे. त्यानिमित्ताने या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिले आहेत. फलटण येथून पुणे-निरा-लोणंद कडे जाणारी वाहतूक बारामती किंवा वाठार स्टेशन येथून पुणे येथे जाण्यासाठी शिरगाव घाटातून वळवण्यात आली आहे.

दिनांक 26 ते 30 जून दरम्यान सातारा जिल्ह्यात संत ज्ञानेश्वर माऊली पालखीचे आगमन आहे. लोणंद, तरडगाव, फलटण, बरड असे चार दिवस पालखी सोहळ्याचा जिल्ह्यातून प्रवास होणार आहे. त्यानिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. दिनांक 25 ते दिनांक 28 जून पर्यंत आदर्की फाटा येथून लोणंद कडे येणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली असून पालखी सोहळ्याच्या वाहनांना या मार्गावर प्रवेश राहणार आहे. लोणंद येथून फलटण कडे जाणारी वाहतूक आदर्की मार्गे फलटणला वळवण्यात आली आहे. फलटण ते लोणंद या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद राहणार असून येथे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. फलटण लोणंद या मार्गावर हलक्या स्वरूपाची वाहने वगळता इतर वाहनांसाठी हा रस्ता पूर्णतः बंद राहील. नातेपुते कडून पुणे बाजूकडे जाणारी वाहतूक माळशिरस, अकलूज येथून बारामती मार्गे पुण्याला वळवण्यात आली आहे. नातेपुते कडून फलटण मार्गे सातार्‍याकडे जाणारी वाहतूक शिंगणापूर तिकाटने, दहिवडी, सातारा अशी वळवण्यात आली आहे. पुण्याकडे जाणारी वाहतूक नातेपुते, दहिगाव, जांब, बारामती येथून पुण्याकडे जाण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. नातेपुते वाई वाठारकडे जाणारी वाहतूक शिंगणापूर तिकाटने, शिंगणापूर, जावळी, कोळकी, झिरपवाडी, विंचूरणी, ढवळपाटी, वाठार मार्गे वळवण्यात आली आहे. दिनांक 29 रोजी पालखी सोहळा बरड येथे मुक्कामी सकाळी सहा वाजता मार्गस्थ होणार आहे. यावेळी वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये याकरिता फलटण ते पंढरपूर रोड बरडकडे जाण्याऐवजी फलटण, दहिवडी चौक, कोळकी, शिंगणापूर तिकाटने, वडले, पिंपरद, बरड या मार्गे वळविण्यात आली आहे. या सर्व वाहतूक बदलांची वाहन चालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
संमेलनासाठी माझे 99 रुपये; मी 999 रुपये देणार
पुढील बातमी
कास तलाव जूनमध्येच ओव्हरफ्लो

संबंधित बातम्या