दूध भेसळीवर कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन : स्वराज क्रांती संघटनेचा इशारा

अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांना निवेदन

by Team Satara Today | published on : 17 June 2026


सातारा : सातारा जिल्ह्यात दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या भेसळीविरोधात तातडीने कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वराज्य क्रांती संघटनेचे युवकचे जिल्हाध्यक्ष प्रकाश साबळे यांनी अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांना दिला आहे.

संघटनेचे जिल्हा युवक अध्यक्ष प्रकाश राजाराम सावळे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला निवेदन देत जिल्ह्यातील काही व्यापारी आणि व्यावसायिकांकडून दूधामध्ये भेसळ करून सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक होत असल्याचा आरोप केला आहे. तसेच दूधापासून तयार होणारे पनीर, खवा आणि अन्य दुग्धजन्य पदार्थांमध्येही मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही संबंधित यंत्रणेकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनला असून भेसळ करणार्‍यांविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, संबंधित व्यापारी व व्यावसायिकांवर आठ दिवसांच्या आत कारवाई करण्यात यावी. अन्यथा स्वराज्य क्रांती संघटनेच्या वतीने अन्न व औषध प्रशासन कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल. या निवेदनाची प्रत अन्न व औषध प्रशासन मंत्रालयाचे सचिव तुकाराम मुंढे यांनाही माहितीस्तव पाठविण्यात आली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पाणी द्या, नाहीतर पालिकेला टाळे ठोकू; समाधीचा माळ, गडकर आळीतील महिलांचा पालिकेत संतापाचा स्फोट
पुढील बातमी
जलमंदिरवर महायुतीच्या नेत्यांची बैठक; विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हालचालींना वेग

संबंधित बातम्या