सातारा: शासकीय कर्तव्यात वारंवार कसूर करणे, वरिष्ठांच्या आदेशांचे उल्लंघन आणि मंत्र्यांच्या अतिमहत्त्वाच्या बैठकांना सातत्याने गैरहजर राहणे साताऱ्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांना चांगलेच महागात पडले आहे. राज्य सरकारने त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कठोर कारवाई केली असून, या निर्णयामुळे जिल्हा परिषद प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव मो. बा. ताशिलदार यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी व मार्च महिन्यात पार पडलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांदरम्यान चोपडे यांच्या कामकाजात गंभीर त्रुटी आढळून आल्या होत्या. परीक्षाविषयक तांत्रिक यंत्रणेवर नियंत्रण न ठेवणे, कामे प्रलंबित ठेवणे, दुय्यम पद्धतीने काम हाताळणे आणि तक्रारींची मुदतीत सोडवणूक न करणे यामुळे शिक्षण विभागाची प्रतिमा मलिन झाली होती. याप्रकरणी झालेल्या विभागीय चौकशीत चोपडे यांनी शासकीय सेवकाची कर्तव्ये योग्य रीतीने पार न पाडल्याचे व अनियमितता केल्याचे स्पष्ट झाले होते.
या चौकशीनंतर चोपडे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली होती. मात्र, प्रशासकीय कारवाई सुरू असतानाही त्यांच्या वर्तणुकीत कोणतीही सुधारणा झाली नाही. उलट, पालकमंत्री व इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या अतिमहत्त्वाच्या बैठकांना चोपडे यांनी सातत्याने दांडी मारली. तसेच जिल्हा परिषदेच्या इतर महत्त्वाच्या बैठकांनाही ते अनुपस्थित राहिल्याचे समोर आले. वरिष्ठांकडून वारंवार सूचना व ताकीद देऊनही कारभारात सुधारणा न केल्याने अखेर राज्य शासनाने निलंबनाचा बडगा उगारला आहे.
निलंबित कालावधीत चोपडे यांनी पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता कामा नये, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. या धडक कारवाईमुळे जिल्हा परिषदेतील कामचुकार अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.मंत्र्यांच्या बैठकांना टाळाटाळ करणे तसेच १० वी, १२ वी परीक्षांमधील गैरकारभाराचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
वारंवारची शिस्तभंग अन् कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी साताऱ्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे निलंबित
वारंवार सूचना व ताकीद देऊनही कारभारात सुधारणा न केल्याने अखेर राज्य शासनाने निलंबनाचा बडगा उगारला
by Team Satara Today | published on : 17 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा