सातारा : दरोड्याच्या तयारीशी संबंधित गुन्ह्यात गेल्या सात वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार असलेल्या आरोपीला सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर जेरबंद केले. विलास सुखदेव वाईकर (रा. मतकर कॉलनी झोपडपट्टी, सातारा) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. मोळाचा ओढा परिसरातील आयटीआय महाविद्यालयाजवळ ही कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यातील पाहिजे आणि फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी स्वतंत्र पथके तयार करून फरार आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.
या मोहिमेदरम्यान २३ नोव्हेंबर रोजी पोलीस निरीक्षक घोडके यांना गोपनीय बातमीदारामार्फत विलास वाईकर याच्याबाबत माहिती मिळाली. शाहूपुरी पोलीस ठाण्यात २०१९ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात तो गेल्या सात वर्षांपासून फरार असल्याचे निष्पन्न झाले होते. संबंधित आरोपी मोळाचा ओढा परिसरात फिरत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आयटीआय महाविद्यालय परिसरात संशयिताचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव विलास सुखदेव वाईकर असल्याचे सांगितले. गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पुढील तपास आणि कायदेशीर कारवाईसाठी त्याला शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर, पोलीस हवालदार संतोष सपकाळ, शरद बेबले, लैलेश फडतरे, अमित माने, अमित सपकाळ, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव आणि किरण जगताप यांनी सहभाग घेतला.
सात वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा अखेर जाळ्यात; मोळाचा ओढा परिसरातून फरार आरोपीला अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
by Team Satara Today | published on : 25 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा