बेकायदा शस्त्र विक्रीप्रकरणी साताऱ्यात तडीपार तरुणाच्या मुसक्या आवळल्या; एलसीबीची कारवाई, 3.29 लाखांचा मुद्देमाल जप्त

by Team Satara Today | published on : 28 August 2026


सातारा : जिल्ह्यातून तडीपार केलेले असतानाही बेकायदेशीर शस्त्रांचा व्यवहार करण्यासाठी सातारा शहरात आलेल्या एका तरुणाच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या. करंजे येथील महानुभव मठ परिसरात रचलेल्या सापळ्यात तीन देशी बनावटीच्या पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे घेऊन आलेल्या महेश गणपत इंगळे (वय 27, रा. आखरी रस्ता, मंगळवार पेठ, फलटण) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिस्टल, काडतुसे, मोबाईल आणि मोटारसायकल असा 3 लाख 29 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

महेश इंगळे याला यापूर्वीच सातारा जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. मात्र, तडीपारीचा आदेश धाब्यावर बसवत तो सातारा शहरात दाखल झाला आणि शस्त्रांच्या व्यवहाराच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे एलसीबीने ही कारवाई केली.

जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रांची खरेदी-विक्री तसेच बाळगणार्‍यांविरोधात पोलिसांनी मोहीम तीव्र केली आहे. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अशा संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते.

दरम्यान, करंजे येथील महानुभव मठाजवळ फलटण येथील एक इसम शाईन मोटारसायकलवरून गावठी पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती एलसीबीला मिळाली. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने परिसरात सापळा रचला.

रात्री सुमारे 8.10 वाजता संशयित इसम मोटारसायकलवरून घटनास्थळी आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता मॅग्झीनसह तीन देशी बनावटीच्या पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे आढळून आली. त्याच्याकडील मोबाईल हॅन्डसेट आणि मोटारसायकलही पोलिसांनी ताब्यात घेतली. त्यानंतर पोलिसांनी संशयिताची पार्श्वभूमी तपासली असता तो सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे अवैध शस्त्र बाळगण्यासह तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 271/2026 दाखल करण्यात आला असून, भारतीय हत्यार कायदा कलम 3(1), 25 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव, पोलीस उपनिरीक्षक रोहित फार्णे, परितोष दातिर तसेच एलसीबीच्या पथकाने केली. जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे अमोल घाडगे यांच्यासह अधिकारी व अंमलदारांनी कारवाईत सहभाग घेतला.

पिस्टल कुठून आली? खरेदीदार कोण?

तीन पिस्टल एकाचवेळी कुठून आणण्यात आली, त्यामागे कोणाचा सहभाग आहे, या शस्त्रांची विक्री नेमकी कोणाला होणार होती आणि या प्रकरणामागे मोठे शस्त्रविक्रीचे रॅकेट आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. त्यामुळे संशयिताच्या चौकशीतून अवैध शस्त्रांच्या पुरवठा साखळीतील आणखी नावे समोर येण्याची शक्यता आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पत्रकार मंदार गोंजारी यांच्याविरोधात दाखल गुन्हा मागे घ्या; सातारा पत्रकार संघाच्यावतीने पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांना निवेदन
पुढील बातमी
खा. उदयनराजेंवरील फेसबुक कमेंट्सने संताप; सातारा शहर पोलिसांत तक्रार; संबंधित फेसबुक अकाउंटधारकांवर कारवाईची मागणी

संबंधित बातम्या